६ लाख ७९ हजार रुपये निधी अपेक्षित
तालुक्यातील २७० खातेदारांना पावसाचा फटका
- ६ लाख ७९ हजार रुपये निधी अपेक्षित : २७० शेतकऱ्यांचे नुकसान
विजय नागपुरे
कळमेश्वर : कळमेश्वर तालुक्यात पडलेल्या गुरुवारच्या पावसाने ३४ गावे बाधित झाली असून ९५.२४ हेक्टर शेतीचे नुकसान झाले आहे. त्यामध्ये ४० घरांचे अंशत: नुकसान झाले असून, ५ जनावरेही वाहून गेली आहेत. नुकसान भरपाईसाठी ६ लाख ७९ हजार ११४ रुपयांचा निधी अपेक्षित असल्याची माहिती तहसीलदार सचिन यादव यांनी दिली.
कळमेश्वर तालुक्यात २२ जुलैला झालेल्या अतिवृष्टीमुळे ३३ टक्क्यापेक्षा जास्त नुकसान झालेल्या शेतजमिनींबाबत तहसील व कृषी प्रशासनाने प्राथमिक अहवाल तयार केला आहे. यामध्ये नदी-नाल्यांच्या काठावर असलेल्या शेतजमिनीतील पिकांना मोठा फटका बसला आहे. नदी-नाल्यांच्या पुराचे पाणी शिरल्याने पीक वाकले. तसेच जमीन खरडून गेली आहे.
मृग नक्षत्रात पेरणीचा हंगाम सुरू झाल्यानंतर सुरुवातीला पेरणीयोग्य पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कपाशीची लागवड केली. मात्र नंतरच्या काळात पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंतित झाला होता. त्यातच अनेकांना दुबार पेरणी करावी लागली होती, तर काहींनी तूर लावणे पसंत केले. शेवटी पावसाची वाट बघणारा शेतकरी समाधानकारक पावसाने सुखावला असला तरी, नदी-नालेकाठावरील शेती असलेल्या शेतकऱ्यांवर मात्र संकट कोसळले आहे.
२२ जुलैच्या मुसळधार पावसाने कळमेश्वर मंडलात सर्वाधिक नुकसान झाले आहे. कापूस, सोयाबीन, तूर व इतर पिकांचे ३४.६५ हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून ६९ शेतकऱ्यांना फटका बसला आहे. सर्वात कमी फटका धापेवाडा मंडलाला बसला आहे. येथे १८.३४ हेक्टर शेतीपिके बाधित झाली आहेत.
नुकसान झालेल्या पिकांची आराजी
कापूस - ७१.८०
सोयाबीन- २.२०
तूर- १६.४३
इतर- ०.८५
भाजीपाला- २.८६
संत्रा, मोसंबी व इतर -१.१०
३३ टक्क्यापेक्षा जास्त नुकसान झालेली गावे...
वरोडा, कळमेश्वर, निमजी, निंबोली, आष्टिकला, परसोडी (रिठी), गुमथळा, सोनोली (रिठी), वाठोडा, कन्याढोल, मोहगाव, बोरगाव (खुर्द), झुनकी, सिंदी, खैरी (लखमा), गोवरी, डोरली (मनी), धुरखेडा, तेलगाव, तिडंगी, दाढेरा, तेलकामठी, सोनोली (नाईक), परसोडी (वकील), पांजरा (रिठी), दुधबर्डी (रिठी), तिडंगी, पानउबाळी, सुसुंद्री, चाकडोह, उपरवाही, सावंगी (तोमर), घोगली आणि घोराड.
---
नुकसानीचे सर्व्हे करताना तहसील कार्यालयाचे अधिकारी, कर्मचारी.