नरखेड : तालुक्यातील १७ ग्रामपंचायतींसाठी येत्या १५ जानेवारीला मतदान हाेणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी (बुधवार, दि. ३०) उमेदवार व त्यांच्या समर्थकांनी तहसील कार्यालयाच्या आवारात गर्दी केली हाेती. या १७ ग्रामपंचायतींमधील ५५ प्रभागांमधून १४७ सदस्य निवडून द्यावयाचे असून, त्यासाठी ३४३ उमेदवारांनी त्यांचे उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
या १७ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी एकूण २६,९०२ मतदार मतदानाचा हक्क बजावणार असून, त्यात १४,११८ पुरुष व १२,७८४ महिला मतदारांचा समावेश आहे. तालुक्यातील जलालखेडा येथील १३ जागांसाठी ३४ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले असून, खैरगाव येथील १३ जागांसाठी ४२, अंबाडा (सायवाडा) येथील ९ जागांसाठी १४, थडीपवनी येथील ९ जागांसाठी २६, सायवाडा येथील ९ जागांसाठी १७, सिंजर येथील ७ जागांसाठी १४, खरबडी येथील ९ जागांसाठी १७, महेंद्री येथील ७ जागांसाठी १४, दातेवाडी येथील ७ जागांसाठी १५, उमठा येथील ७ जागांसाठी १८, जामगाव (खुर्द) येथील ९ जागांसाठी पाच, पेठईस्माईलपूर येथील ९ जागांसाठी १७, मदना येथील ७ जागांसाठी १९, देवग्राम (थुगावदेव) येथील ९ जागांसाठी २२, माणिकवाडा येथील ९ जागांसाठी २९, येरला (ई) येथील ७ जागांसाठी २७, देवळी येथील ७ जागांसाठी १३ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत.