हायकोर्टात माहिती : १० मार्चला अधिसूचना जारीनागपूर : केंद्र शासनाच्या आरोग्य विभागाने आरोग्यास धोकादायक ३४४ मिश्र औषधांचे उत्पादन व विक्रीवर बंदी घातली असून यासंदर्भात १० मार्च रोजी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला गुरुवारी ही माहिती देण्यात आली. आरोग्यास धोकादायक मिश्र औषधे बाजारात सर्रास विकली जात असल्याच्या वृत्ताची दखल घेऊन न्यायालयाने स्वत:च जनहित याचिका दाखल केली आहे. याचिकेवर न्यायमूर्तीद्वय भूषण गवई व स्वप्ना जोशी यांच्यासमक्ष सुनावणी झाली. केंद्र शासनाने वरील माहिती दिल्यानंतर पुढील मुद्दे विचारात घेण्यासाठी चार आठवड्यानंतर सुनावणी निश्चित करण्यात आली आहे.कोणतेही औषध बाजारात विक्रीस आणण्यासाठी आवश्यक चाचण्या करणे गरजेचे आहे. निर्धारित चाचण्यात यशस्वी ठरलेल्या औषधींना ड्रग्ज कंट्रोलर जनरल आॅफ इंडियाद्वारे मान्यता दिली जाते. यानंतर अशा औषधींचे उत्पादन करण्यासाठी संबंधित राज्य शासनाकडून परवानगी घेणे आवश्यक आहे. ड्रग्ज कंट्रोलरची मान्यता नसलेल्या औषधींच्या उत्पादनास राज्य शासन परवानगी देऊ शकत नाही. परंतु, महाराष्ट्रात ड्रग्ज कंट्रोलरची मान्यता नसलेल्या अनेक औषधींच्या उत्पादनास परवानगी देण्यात आली आहे. याप्रकरणात अॅड. आनंद परचुरे न्यायालय मित्र असून केंद्र शासनातर्फे अॅड. मुग्धा चांदूरकर यांनी बाजू मांडली.(प्रतिनिधी)
३४४ मिश्र औषधांवर बंदी
By admin | Published: April 01, 2016 3:20 AM