नागपूर : पोलिस आयुक्तांनी सीताबर्डी मेनरोडवर हॉकर्सना दिलेल्या परवानगीची मुदत संपल्यानंतर तेथे पुन्हा वाद उद्भवला आहे. केवळ १०३ हॉकर्सना परवानगी दिल्याच्या निषेधार्थ १८ नोव्हेंबरपासून फुटपाथ दुकानदारांनी संप सुरू केला आहे. तसेच ३४४ फुटपाथ दुकानदारांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली आहे. त्यावरील न्यायालयीन निर्णयापर्यंत संप सुरू राहणार आहे.
याचिकाकर्ते आणि नागपूर फेरीवाला, फुटपाथ दुकानदार संघटनेचे सरचिटणीस रज्जाक कुरेशी यांनी सांगितले की, मी टाऊन व्हेंडिंग कमेटीचा निवडून आलेला सदस्य आहे. परंतु पोलिस आयुक्तांनी १०३ दुकानदारांना परवानगी दिलेल्या यादीत माझे नाव नाही. महानगरपालिका आणि पोलिस आयुक्त कार्यालयाने १०३ हॉकर्सची यादी कुठून तयार केली, याची माहिती नाही. महानगरपालिकेने राज्य शासनाकडे १ बाय१ मीटर म्हणजे सव्वातीन फूट क्षेत्रफळ जागेचा प्रस्ताव पाठविला आहे. हा प्रस्ताव मंजुरीसाठी पाठविण्यापूर्वी टीव्हीसी सदस्यांना विश्वासात घेण्यात आले नाही. त्यामुळे हा वाद निर्माण झाला आहे. पोलिस आयुक्तांनी टीव्हीसीची मान्यता नसलेला १ बाय१ मीटर जागेचा प्रस्ताव वैध मानला आहे. त्याविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे.