नागपूर: वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाटमधील राणी दुर्गावती वर्धा जिल्हा आदिवासी सहकारी सूतगिरणीच्या व्यवस्थापनातील अधिकाऱ्यांनी एका खासगी कंपनीच्या ३.४५ कोटींचे सिक्युरिटी डिपॉझिट परत न करता ते पैसे दाबून ठेवल्याची बाब समोर आली आहे. या प्रकरणात कंपनीच्या तक्रारीवरून सूतगिरणीचे तत्कालीन चेअरमन गुलाबराव पंधरे, मुलगा प्रकाश पंधरे व व्यवस्थापकीय संचालक दिनेशचंद्र शर्मा यांच्याविरोधात बेलतरोडी पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ट्रान्सरेल लाइटिंग लिमिटेड या कंपनीचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर सूर्यनारायण डोलीपाला यांनी या प्रकरणात तक्रार केली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार सूतगिरणीतर्फे एका पोर्टलवर ३४५ कोटींच्या कामाची निविदा प्रसिद्ध करण्यात आली होती. २०१८ साली सूतगिरणीचे तत्कालीन चेअरमन गुलाबराव पंधरे, मुलगा प्रकाश पंधरे व व्यवस्थापकीय संचालक दिनेशचंद्र शर्मा यांनी ट्रान्सरेल लाइंटिंग लिमिटेडच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली व डिसेंबर २०१८ मध्ये वर्क ऑर्डर जारी केली. रिफंडेबल सिक्युरिटी डिपॉझिटच्या नावाखाली सूतगिरणीच्या अधिकाऱ्यांनी ३.४५ कोटी रुपये मागितले. ९० दिवसांत सूतगिरणीच्या अधिकाऱ्यांनी कामाच्या जागेचा ताबा कंपनीला दिला नाही, तर डिपॉझिट परत करावे लागेल अशा अटी-शर्तींमध्ये नमूद होते. सहा महिने अधिकाऱ्यांनी कंपनीला कुठलीही जागा दिलीच नाही.
नोव्हेंबर २०१९ मध्ये शर्माने कंपनीला पत्र पाठवून डिपॉझिट परत करण्याबाबत ९० दिवसांचा अवधी मागितला. मात्र कंपनीकडून २४ टक्के व्याजासह रक्कम परत करण्याबाबत पत्र पाठविण्यात आले. जून २०२० पर्यंत सूतगिरणीकडून कुठलेही पैसे परत मिळाले नाही. त्यामुळे डोलीपाला यांनी पत्र लिहून कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे स्पष्ट केले. मार्च २०२१ मध्ये अखेर त्यांनी नागपूर पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखा व बेलतरोडी पोलिस ठाण्यात तक्रार केली. या प्रकरणात पोलिसांची तीन वर्षांहून अधिक काळ प्राथमिक चौकशीच चालली. अखेर सोमवारी या प्रकरणात गुलाबराव पंधरे, प्रकाश पंधरे व दिनेशचंद्र शर्मा यांच्याविरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम ४२०, ४०६ व ३४ अंतर्गत फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.