लाेकमत न्यूज नेटवर्क
कामठी : पाेलिसांनी नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्गावरील लिहिगाव शिवारात केलेल्या कारवाईमध्ये रेतीची विना राॅयल्टी वाहतूक करणारे दाेन ट्रक पकडले. त्यात चाैघांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून एकूण ३४ लाख ५० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई साेमवारी (दि. १) मध्यरात्री १.३० वाजताच्या सुमारास करण्यात आली.
अटक करण्यात आलेल्या आराेपींमध्ये राजेंद्रसिंग भालसिंग राजपूत (४३, रा.पारडी, नागपूर), बंटी उर्फ हरिशंकर जगन्नाथ सनाेडिया (२९, रा. भांडेवाडी, पारडी, नागपूर), अमित मेश्राम (२७, रा.कांद्री-कन्हान, ता.पारशिवनी) व अक्षय राजू गात (२४, रा.डायमंडनगर, नागपूर) या चाैघांचा समावेश आहे. कामठी (नवीन) पाेलिसांचे पथक गस्तीवर असताना, त्यांना लिहिगाव शिवारातून एमएच-४०/एके-४५२५ आणि एमएच-४०/वाय-९६७५ क्रमांकाचे ट्रक थांबवून झडती घेतली. त्या ट्रकमध्ये रेती असल्याचे निदर्शनास येताच, पाेलिसांनी कागदपत्रांची तपासणी केली.
ती रेती कन्हान नदीतील असून, विनाराॅयल्टी असल्याचे चाैकशीत स्पष्ट हाेताच, पाेलिसांनी दाेन्ही ट्रक रेतीसह ताब्यात चालकांसह मालकांना अटक केली. त्यांच्याकडून प्रत्येकी १७ लाख रुपयांचे दाेन ट्रक व त्यातील प्रत्येकी २५ हजार रुपये किमतीचा पाच ब्रास रेती असा एकूण ३४ लाख ५० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती ठाणेदार संजय मेंढे यांनी दिली. या प्रकरणी कामठी (नवीन) पाेलिसांनी भादंवि ३७९, ३४ अन्वये गुन्हा नाेंदवून तपास सुरू केला आहे. ही कारवाई सहायक पोलीस निरीक्षक सुरेश कन्नके, पप्पू यादव, मंगेश लांजेवार, राजेंद्र टाकळीकर, सुधीर कनोजिया, संदीप गुप्ता, उपेंद्र यादव यांच्या पथकाने केली.