लाेकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर जिल्ह्यात दररोज १३५ मेट्रिक टन ऑक्सिजनचे उत्पादन होत आहे. परंतु, कोरोना संक्रमितांची वाढत्या संख्येमुळे ऑक्सिजनची मागणीही वाढत आहे. त्यामुळे, दररोज ३५ मेट्रिक टन ऑक्सिजन बाहेरून मागवावे लागत आहे. दरम्यान जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी शुक्रवारी बुटीबोरी व हिंगणा येथील ऑक्सिजन प्लांटचे निरीक्षण केले आणि अग्निरोधक उपाययोजना सुनिश्चित करण्याचे निर्देश दिले.
शुक्रवारी जिल्हाधिकाऱ्यांनी बुटीबोरी औद्योगिक क्षेत्र व हिंगणा येथील ऑक्सिजन प्लांटचे निरीक्षण केले. यावेळी त्यांनी राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी होत असलेल्या आगीच्या घटनांचा विचार करून सजगतेचे व ऑक्सिजनचे संग्रहण योग्य तऱ्हेने करण्याचे निर्देश दिले. ऑक्सिजनच्या पुरवठ्यावर नजर ठेवण्यासाठी जिल्हा प्रशासनाचे दोन अधिकारी नियुक्त केल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी उपविभागीय अधिकारी इंदिरा पखाले व हिंगणाचे तहसीलदार संतोष खंडारे उपस्थित होते.
.................