ऑनलाइन लोकमतनागपूर, दि. 22 - योग्य सुरक्षेच्या मागणीसाठी सामूहिक रजेवर गेलेल्या मेयो, मेडिकलच्या ४४० निवासी डॉक्टरांवरील निलंबनाच्या कारवाईला इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) नागपूर शाखेने निषेध व्यक्त करीत, बुधवारी दुपारपासून संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. यात शहरातील आयएमएचे ३,५०० डॉक्टर सहभागी झाले असून, केवळ आकस्मिक सेवा सुरू ठेवण्यात आली आहे. परंतु दोन दिवसांत ही कारवाई मागे न घेतल्यास आपत्कालीन सेवाही बंद करण्यात येईल, अशी माहिती आज आयएमए चे अध्यक्ष डॉ. अविनाश वासे यांनी पत्रपरिषदेत दिली. यावेळी इंडियन मेडिकल असोसिएशनचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अशोक अढाव, महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेचे सदस्य डॉ. अनिल लद्धड, आयएमएच्या सचिव डॉ. अर्चना कोठारी, डॉ. मिलिंद नाईक, डॉ. वाय. एस. देशपांडे आदी उपस्थित होते. डॉ. लद्धड म्हणाले, शासकीय रुग्णालयात निवासी डॉक्टर म्हणून शासनाने नेमणूक केली आहे. २४ तास ते रुग्णांच्या सेवेत असतात. यामुळे त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी शासनाची आहे. यातच जर योग्य सुरक्षेच्याअभावी त्यांना मारहाण होत असेल तर याला संबंधित रुग्णालयाचे अधिष्ठाता, वैद्यकीय शिक्षण विभाग व सरकार जबाबदार आहे. डॉ. अशोक अढाव म्हणाले, आज दुपारपासून आयएमए चे सर्व सदस्य डॉक्टर संपात सहभागी झाले आहेत. शहरातील ६५० क्लिनिक व ३०० वर रुग्णालयांचे बाह्यरुग्ण विभाग (ओपीडी) अनिश्चित काळासाठी बंद राहील. केवळ आकस्मिक विभाग सुरू राहील. डॉ. वाय. एस. देशपांडे म्हणाले, निवासी डॉक्टर सामूहिक रजेवर जाण्यापूर्वी तशी सूचना अधिष्ठात्यांना दिली होती. निवासी डॉक्टर सामूहिक रजेवर गेल्यानंतर १२ तासांत योग्य सुरक्षा व्यवस्थेत बदलही करणे शक्य होते. परंतु तसे न करता थेट निलंबनाची कारवाई करणे, हे योग्य नाही. सुरक्षेला घेऊन गेल्या कित्येक वर्षांपासून निवासी डॉक्टर मागणी करीत आहे, परंतु सरकार गंभीर नाही. डॉ. प्रशांत निखाडे म्हणाले, दहशतवादी कसाबला फाशी देण्यापूर्वी त्याच्या सुरक्षेवर कोट्यवधी रुपयांचा खर्च करण्यात आला. परंतु रुग्णाचा जीव वाचविणाऱ्या डॉक्टरांनी योग्य सुरक्षा मागितली तर त्यांना निलंबनाची शिक्षा ठोठावण्यात आली, हे योग्य नाही. डॉ. मिलिंद नाईक म्हणाले, २०१० पासून ते आतापर्यंत नागपुरातील डॉक्टरांना मारहाण झालेल्या २६ प्रकरणांमधून केवळ एकाच प्रकरणाचा निकाल लागला. यामुळे कायदा हातात घेणाऱ्यांवर वचक राहिला नाही. यामुळे पुन्हा पुन्हा अशा घटना घडतात.
आयएमएचे ३,५०० डॉक्टर संपावर
By admin | Published: March 22, 2017 9:40 PM