लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पंधराव्या वित्त आयोगातून जिल्ह्याला दुसऱ्या हप्त्यासाठी ३६ कोटीवरचा निधी मंजूर झाला आहे. यापैकी प्रत्येकी ३.६० कोटी निधी हा जिल्हा परिषद व पंचायत समितीला मिळणार असून, उर्वरित २८ कोटीवरचा निधी हा ग्राम पंचायतींना मिळणार आहे. गावाची लोकसंख्या व क्षेत्रफळाच्या प्रमाणात निधी मिळणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चौदाव्या वित्त आयोगापासून निधी थेट ग्रामपंचायतीच्या खात्यात जमा करण्याचे निर्देश दिले. आता पंधराव्या वित्त आयोगाचा सन २०२१-२२ या आर्थिक वर्षाच्या जनरल बेसिक ग्रँटच्या (अनटाईड) अबंधित स्वरुपातील दुसऱ्या हप्त्याची रक्कम केंद्र शासनाने दिली आहे. ही रक्कम राज्य शासनाकडून जिल्ह्यांना वर्ग करण्यात येते. सदर निधी सर्व पंचायत राज संस्थांना जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत यांमध्ये अनुक्रमे १०:१०:८० या प्रमाणात वितरीत करण्यात येत आहे. त्यानुसार दुसरा हप्ता ३६ कोटी १ लाख ७ हजार जिल्ह्यासाठी मंजूर झाला आहे. यापैकी दहा टक्के निधी म्हणजेच ३ कोटी ६० लाख ११ हजार हा जि.प.ला व तितकाच निधी पंचायत समितीलाही मिळणार आहे.