लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरातील रस्त्यांचा विकास व्हावा यासाठी महापालिकेअंतर्गत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज रस्ते विकास कार्यक्रमांतर्गत सिमेंट रस्त्यांची कामे सुरू आहेत. मात्र पहिल्या टप्प्यातील रस्त्यांच्या कामाला विलंब झाल्याने महापालिकेला यावर ३६ कोटींचा जादाचा खर्च करावा लागणार आहे. यातील ५.४६ कोटी कंत्राटदाराला देण्यात आले आहेत. यावर महालेखाकारांनी आक्षेप घेतला आहे. यावरून विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. सोमवारी सर्वसाधारण सभेत यावर वादळी चर्चा होण्याची शक्यता आहे.पहिल्या टप्प्यातील १०१ कोटी १८ लाखांचा खर्च अपेक्षित असलेले ३० सिमेंट रस्त्यांचे पॅकेज मेसर्स युनिटी इन्फ्रा प्रोजेक्ट ७७.५० कोटीत देण्यात आले होते. कंत्राटदाराने ५ जून २०१३ पर्यंत सिमेंट रस्त्यांची कामे पूर्ण करावयाची होती. परंतु निर्धारित कालावधीत कामे पूर्ण करण्यात आलेली नाहीत. त्यामुळे महापालिकेने कंत्राटदारांवर ५.३७ कोटींची दंडात्मक कारवाई केली होती. या निर्णयाला आव्हान दिल्याने यावर महापालिकेने मध्यस्थाची नियुक्ती केली होती. त्यात मध्यस्थांनी यावर ताशेरे ओढून महापालिकेच्या विरोधात निर्णय दिला होता.महापालिकेने संबंधित रस्त्यांवरील अतिक्रमण हटविले नाही. निकषानुसार रुंदीकरणासाठी सर्व रस्ते उपलब्ध नसल्याने कामाच्या पद्धतीत बदल करण्यात आला. यामुळे कामाला विलंब झाल्याचे निदर्शनास आले. यामुळे या कामावर ३६ कोटींचा जादाचा खर्च करावा लागणार आहे. यावर महालेखाकार यांनी आक्षेप घेतला आहे. याबाबतचा प्रश्न काँग्रेसचे नगरसेवक संदीप सहारे यांनी नोटीसद्वारे चर्चेसाठी दिला आहे. दरम्यान जनमंच व अन्य काही सामाजिक संघटनांनीही सिमेंट रस्त्यांची ‘थर्डपार्टी’मार्फत चौकशी करण्याची मागणी केली आहे. परंतु अद्याप ही मागणी मान्य करण्यात आलेली नाही.प्रलंबित फाईल्समुळे नगरसेवक नाराजसिमेंट रस्त्यांच्या कामात महापालिकेचाही आर्थिक वाटा आहे. यामुळे शहरातील अन्य कामांवर परिणाम झाला आहे. प्रभागातील विकास कामांच्या फाईल्स प्रलंबित ठेवल्या जात असल्याने नगरसेवक नाराज आहेत. हा मुद्दा सोमवारच्या सभागृहात उपस्थित करणार असल्याने सर्वसाधारण सभा वादळी होण्याची शक्यता आहे.
सिमेंट रस्त्यांवर होणार ३६ कोटींचा अधिक खर्च!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2017 12:34 AM
शहरातील रस्त्यांचा विकास व्हावा यासाठी महापालिकेअंतर्गत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज रस्ते विकास कार्यक्रमांतर्गत सिमेंट रस्त्यांची कामे सुरू आहेत.
ठळक मुद्देमहालेखाकारांचा आक्षेप : विलंबाचा फटका, सर्वसाधारण सभेत मुद्दा गाजणार