नागपूर: देशात सर्वाधिक विजेचे दर महाराष्ट्रात आहेत. त्याचा सर्वांत जास्त फटका विदर्भ आणि मराठवाड्यातील उद्योगांना बसला आहे. जास्त वीज दरामुळे महाराष्ट्रातील ३६ स्टील उद्योग बंद झाले आहेत, तर १० उद्योग गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड या राज्यांमध्ये स्थलांतरित झाले आहेत. सहा उद्योगांनी विजेच्या मागणीत कपात केली आहे. पुढील काही वर्षांत वीज दरामुळे अनेक उद्योग बंद होऊन राेजगाराचा प्रश्न निर्माण होईल, अशी उद्योजकांना चिंता आहे. बहुतांश स्टील उद्योग बंद झाल्यामुळे मध्य प्रदेश, छत्तीसगड, गोवा, गुजरात तसेच ओडिशा आणि झारखंड या राज्यांनी महाराष्ट्राची स्टील बाजारपेठ काबीज केली आहे. याकडे शिंदे-फडणवीस सरकारने लक्ष द्यावे, अशी उद्योजकांची मागणी आहे.
उद्योगांच्या वीज मंजुरीला मर्यादेपलीकडे विलंब होतो. सरकारने हस्तक्षेप करून या प्रकरणाची गांभीर्याने दखल घ्यावी. वीज सबसिडीसंदर्भात फडणवीस सरकारने २०१९ मध्ये काढलेल्या अध्यादेशाची अंमलबजावणी २०२४ पर्यंत करावी आणि क्रॉस सबसिडी व इतर शुल्क कमी करून स्वस्त वीज खरेदी करावी.- आर. बी. गोयनका, उपाध्यक्ष, विदर्भ इंडस्ट्री असोसिएशन
स्थलांतरित झालेले उद्योग - एमआय अलॉय वाडा (जि. पालघर) येथून सिल्व्हासा येथे. - बलबीर स्टील वाडा येथून वापी येथे.- के. सी. फेरो, वाडा येथून सिल्व्हासा येथे. सिल्व्हासा येथे हनुमान स्टील आणि ट्यूब्स ट्यूब्स नावाने नवीन कंपनी सुरू.- युनायटेड इंजि. वर्क्स वाडा येथून दादरा येथे.- स्पायडर मॅन, वाडा येथून दमण येथे. दमणमध्ये श्री साई नावाने कंपनी सुरू.- बाबा मुगीपा, वाडा येथून राजस्थानला स्थलांतरित.- सरलिया नागपूर येथून छत्तीसगडला स्थलांतरित.- मीनाक्षी नागपूर येथून कर्नाटक आणि इंदूर येथे स्थलांतर. - रेजिंट जालनाहून सिल्व्हासा येथे स्थलांतरित. - गणपती इस्पात सिल्व्हासा येथे स्थलांतरित.