नागपूर : शहरातील विकास कामाच्या नावाखाली वृक्षकटाईचा सुरू असलेला प्रकार अद्याप थांबलेला नाही. अजनी परिसरात मॉडेल स्टेशनच्या नावाखाली हजारो वृक्षांची कत्तल झाल्यानंतर आता महानगरपालिकेने एम्प्रेस मिल ते बजेरियापर्यंतचा नवा मार्ग प्रस्तावित केला आहे. या प्रस्तावित मार्गासाठी ३६५ झाडे तोडली जाणार असल्याची माहिती आहे.
यापूर्वी या मार्गाच्या निर्मितीसाठी ३८० झाडे तोडण्याचा प्रस्ताव होता. मात्र मागील काळात यावर झालेल्या सुनावणीत ३८० पैकी ६५ झाडे वाचविण्याची मागणी करण्यात आली होती. यात काही अशोकाची झाडे होती. तर काही झाडांमुळे मार्गाच्या निर्मितीमध्ये कसलीही अडचण नव्हती. मनपा वृक्ष प्राधिकरण समितीने फक्त १५ झाडे वाचविण्यासाठी मंजुरी दिली आहे. अर्थात उर्वरित ३६० झाडे तोडण्यासाठी ही अप्रत्यक्ष परवानगीच आहे. पुन्हा ५ ते १० झाडे वाचविण्यासंदर्भात विचारविनिमय सुरू असल्याचे प्राधिकरणाने सांगितले आहे.
...
वृक्षकटाई सुरू
सध्या मार्गासाठी वृक्षकटाईचे काम सुरू झाले आहे. ही जागा महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महामंडळाच्या ताब्यात आहे. तिथे १५ मीटर रुंद आणि ५०० मीटर लांब रस्ता तयार करून तो मनपाला हस्तांतरित केला जाणार आहे. या कामात मनपाचा निधी खर्च होणार नसल्याचे सांगितले जात आहे. महापौर दयाशंकर तिवारी यांनीच या मार्गासाठी प्रस्ताव दिला होता, हे उल्लेखनीय !
...
१५ मीटर रुंदीचा मार्ग प्रस्तावित
एम्प्रेस मिल ते बजेरियापर्यंत सुमारे १५ मीटर रुंद आणि ६५० मीटर लांबीचा मार्ग प्रस्तावित आहे. या मार्गामुळे स्थानिक नागरिकांना सुविधा मिळेल, असे सांगितले जात आहे. यासंदर्भात मनपाने नागरिकांकडून आक्षेप मागविले होते. त्यानंतर सुमारे ८२८ नागरिकांनी मनपा कार्यालयात आक्षेप दाखल केले होते. डिसेंबर महिन्यात यावर सुनावणी झाली. मात्र ८२८ पैकी फक्त २ व्यक्ती उपस्थित होत्या, हे उल्लेखनीय!
...