लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोना संकटामुळे मनपाच्या उत्पन्नाला जबर फटका बसला आहे. मात्र या कालावधीत निर्बंध असूनही बेकायदेशीरीत्या लग्नसोहळे, कार्यक्रम करणारे, छुप्या पद्धतीने दुकाने सुरू ठेवून विक्री करणारे आणि मास्कशिवाय वावरणाऱ्या ४७ हजारांहून अधिक लोकांकडून महापालिकेच्या उपद्रव शोध पथकाने मागील ११ महिन्यात तब्बल ३ कोटी ६८ लाख ३६ हजार ३०० रुपये दंड वसूल केला आहे. मनपा प्रशासनाने ५ जून २०२० पासून कारवाईला सुरूवात केली. इतका दंड वसूल केल्यानंतरही शहरात नियम मोडणाऱ्यांची संख्या कायम असल्याचे दिसून येते.
कोरोनाच्या पहिल्या लाटेत लॉकडाऊन दरम्यान विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाईला सुरुवात करण्यात आली. सुरूवातीला विनामास्क फिरणाऱ्यांना २०० रुपये दंड आकारला जात होता. यातून ५ जून ते १५ सप्टेंबर २०२० दरम्यान ११ हजार ६४ लोकांकडून २२ लाख १२ हजार ८०० रुपये दंड वसूल करण्यात आला. दंडानंतही विनामास्क फिरणाऱ्यांची संख्या कमी होत नसल्याने १६ सप्टेंबर २०२० पासून ५०० रुपये दंड करण्यात आला. १९ मे पर्यंत ३२ हजार ५८० नागरिकांकडून १ कोटी ६२ लाख ९० हजार रूपये दंड वसूल करण्यात आला. अशा प्रकारे १ कोटी ८५लाख २ हजार ५०० रूपये दंड वसूल करण्यात आला.
लॉकडाऊन कालावधीत शहरात निर्बंधाची अंमलबजावणी करताना ६ जून २०२० पासून ऑड इव्हन कारवाई करण्यात आली. ६ जून ते २१ जुलै २०२० दरम्यान नियमाचे उल्लंघन करणाऱ्या १३८० दुकानदारांकडून १३ लाख ८० हजारांचा दंड वसूल करण्यात आला. तर १७ जुलै २०२० पासून दंडाच्या रकमेत ५ ते १० हजारापर्यंत वाढ करण्यात आली. यात १८ जुलै ते २२ सप्टेंबर २०२० दरम्यान ५ हजाराप्रमाणे ९७९ दुकानदारांकडून ४८ लाख ९३ हजार रूपये दंड वसूल करण्यात आला तर ८ हजार रूपये प्रमाणे १२ दुकानदारांकडून ९६ हजार, १० हजार रुपये प्रमाणे ७३ दुकानदारांकडून ७ लाख २० हजार दंड वसूल करण्यात आला.
मंंगल कार्यालये, लॉन, दुकानदार आदींनी नियमांचे उल्लंघन केल्या प्रकरणी १३१८ प्रकरणात १ कोटी ७ लाख ९५ हजारांचा दंड वसूल करण्यात आला. मनपा आयुक्त राधकृष्णन बी यांच्या निर्देशानुसार एनडीएस पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली.
कोविड नियमाचे उल्लंघन : कारवाई व वसूल दंड
विना मास्क कारवाई - १७३८४५००
ऑड इव्हन दुकाने कारवाई १ हजार प्रमाणे -१३८०००
ऑड इव्हन दुकाने कारवाई ५ हजार प्रमाणे -४ ८९ ५००
ऑड ईवन दुकाने कारवाई ८ हजार प्रमाणे -९६०००
ऑड इव्हन दुकाने कारवाई १० हजार प्रमाणे -७, ३००००
दुकानदार, मंगलकार्यालय, लॉन व अन्य -१,० ७९५०००