नागपूर :
शेतकरी आत्महत्या थांबविण्यासाठी विविध प्रयत्न करण्यात येत असल्याचे दावे प्रशासनातर्फे करण्यात येत असले तरी प्रत्यक्षात ही प्रकरणे कायम आहे. २०२१ साली देशातील एकूण शेतकरी आत्महत्यांपैकी ३७ टक्के घटना या महाराष्ट्र राज्यातील होत्या. सरासरी प्रत्येक तीन आत्महत्यांमागे एक आत्महत्या राज्यात झाली होती. राज्य शासनाच्याच आकडेवारीतून ही धक्कादायक बाब समोर आली आहे.
विधानपरिषदेत डॉ.सुधीर तांबे, राजेश राठोड, अभिजीत वंजारी, अनिल परब इत्यादी सदस्यांनी यासंदर्भात तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या उत्तरानुसार, २०२१ साली देशभरात १० हजार ८८१ शेतकरी व शेतमजुरांनी आत्महत्या केल्या. त्यातील ४ हजार ६४ आत्महत्या महाराष्ट्रात झाल्या होत्या. यात २ हजार ६४० शेतकरी व १ हजार ४२४ शेतमजूर होते. अगदी हिवाळी अधिवेशनाअगोदर म्हणजे सप्टेंबर व ऑक्टोबर या दोन महिन्यांत ४९६ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली.
नागपूर, अमरावती, यवतमाळमध्ये दाहकता कायम
सरकारच्या आकडेवारीनुसार नागपूर व अमरावती विभागात शेतकरी आत्महत्यांची दाहकता काम आहे. फेब्रुवारी ते सप्टेंबर २०२२ या कालावधीत विदर्भात ९९१ आत्महत्यांची प्रकरणे समोर आली. यापैकी अमरावती विभागात ७४९ व नागपूर विभागात २४२ प्रकरणे होती. एकट्या यवतमाळ जिल्ह्यात ऑक्टोबर महिन्यात ३१ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली.