‘गोल्ड स्मगलिंग’ची टोळी सक्रिय : शारजाहवरून पोहोचले नागपूरला नागपूर : गुन्हे शाखा पोलिसांनी गोल्ड स्मगलिंग करणाऱ्या एका टोळीकडून ३८ लाख रुपये किमतीच्या १४०० ग्राम सोन्याचे बिस्कीट जप्त केले. पकडण्यात आलेल्या आरोपीत ठाण्यातील एका दाम्पत्यासह तिघांचा समावेश आहे. आरोपींनी हे सोने शारजाह-नागपूर विमानात गुप्तांगात लपवून आणले होते. बुधवारी सकाळी रेल्वे स्टेशनसमोर करण्यात आलेल्या या कारवाईमुळे विमानतळावर तैनात कस्टम विभाग संशयाच्या घेऱ्यात आले आहे. मो. हुसैन युसूफ अली रंगवाला (४६), त्याची पत्नी रुखसाना रंगवाला (३९) रा. रेहान बाग ठाणे आणि शेख जिलानी अब्दुल कादर (३८) रा. नागदेवी मुंबई अशी अटक करण्यात आलेल्या आरोपीची नावे आहेत. गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त रंजन शर्मा यांनी सांगितले की, पोलिसांना आरोपी हे शारजाहवरून सोने तस्करी करून आणत असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. ते नागपूर विमानतळावर पोहोचल्यावर येथून रेल्वेने मुंबईला जाणार होते. शारजाह-नागपूर विमान हे पहाटे ३.३० वाजता नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचते. त्यामुळे पोलिसांनी मंगळवारी रात्री पासूनच जाळे पसरविले होते. ठोस माहिती आणि खबरी पोलीसांसोबतच असल्याने पोलिसांनी विमानतळ व रेल्वे स्टेशन परिसराची घेराबंदी केली होती. सकाळी ८.३० वाजता आरोपी गणेश टेकडी मार्गावरील उड्डाण पुलाखाली आढळून आले. पोलिसांनी त्यांना पकडले. त्यांच्या जवळील सामानांची झडती घेतली असता काहीही सापडले नाही. पोलिसांना आरोपींजवळ सोन्याचे बिस्कीट असल्याची ठोस माहिती होती. सोन्याची सर्रास तस्करी नागपूर विमानतळावर सोन्याची तस्करी होत असल्याची बाब यापूर्वी सुद्धा उघडकीस आलीआहे. वर्षभरापूर्वी एका सेवानिवृत्त उपअधीक्षकालाच तस्करी करतांना रंगेहात पकडण्यात आले होते. दोन महिन्यांपूर्वी कस्टम विभागानेच एका व्यक्तीला पकडले होते. यानंतरही आरोपी सोन्याची तस्करी करीत आहे. सोन्याची तस्करी करणारी टोळी असून त्यांचे ‘कुरिअर मॅन’ हे मोठ्या स्मगलरसाठी काम करीत असल्याची माहिती आहे.
३८ लाखांचे सोन्याचे बिस्कीट जप्त
By admin | Published: August 27, 2015 2:41 AM