निशांत वानखेडे
नागपूर : या दाेन दिवसांत नागपूर शहरात दाेन शिक्षक नायलाॅन मांजाचे बळी जाता जाता सुदैवाने बचावले. शस्त्रासारखे माणसांचे गळे, अवयव कापणाऱ्या आणि प्राणी-पक्ष्यांचाही बळी घेणाऱ्या नायलाॅन मांजावर ३० मार्च २०१५ साली उच्च न्यायालयाने बंदी घातली हाेती. मात्र शासन-प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे ही बंदी कुचकामी ठरली. राज्यात मागील १५ वर्षांत १८२ जणांचे तर, नागपुरात ३८ जणांचे जीव गेले आहेत. विशेष म्हणजे यात यात मुलांपासून प्राैढांचाही समावेश आहे.
मकर संक्रांतीच्या काळात पतंग उडविणे हा देशातील माेठा उत्सव. असला तरी साधारण: २००६ पासून पतंगबाजीसाठी नायलाॅन मांजाचा वापर वाढल्याने हा उत्सव अनेकांसाठी जीवघेणा ठरला आहे. या जीवघेण्या मांजाविराेधात किंग काेब्रा ऑर्गनायझेशन युथ फाेर्सच्या माध्यमातून अरविंदकुमार रतुडी यांच्या नेतृत्वात रस्त्यावर आणि न्यायालयात लढा दिला जात आहे. रतुडी यांनी राज्यभरात घडलेल्या घटनांचे आकडे गाेळा करून शासन, प्रशासनाला जागे करण्याचा सातत्याने प्रयत्न चालविला आहे. त्यांनी दिलेली आकडेवारी धक्कादायक आहे.
न्यायालयाच्या बंदीनंतर २०१६ पासून राज्यात ९५ ते १०० लाेकांचा नायलाॅन मांजाने जीव घेतला तर ११९ लाेक गंभीर जखमी झाले किंवा अपंग झाले. कुत्री, मांजरी, माकडे, जनावरे असे प्राणीही याचे बळी ठरले. पाच वर्षांत १६०० प्राण्यांनी जीव गमावला तर १३००० पक्ष्यांचाही बळी गेला आहे. ६५०० हजार पक्षी जखमी झाले असून यातले ५०-६० टक्के पक्ष्यांनी प्राण गमावला असण्याची शक्यता रतुडी यांनी व्यक्त केली
नागपुरात ३८ लाेकांचे जीव गेले
मागील १५ वर्षात नागपुरात नायलाॅन मांजाने गळा कापल्याने ३८ लाेकांचा जीव गेला आहे. नायलाॅन मांजाने अपघाती निधनाची यात नाेंद नाही. ३५०० च्या आसपास लाेक गंभीर व अतिगंभीर जखमी झाले. याशिवाय ७५० वर प्राणी आणि १६०० पक्ष्यांनीही मांजामुळे जीव गमावला आहे.
राज्यात १५ वर्षात १८१ बळी
नायलाॅन मांजाचा वापर वाढल्यापासून मागील १५ वर्षांत राज्यात १८१ लाेकांनी प्राण गमावले आहेत. ८४ लाेक अपंग झाले. ७००० च्या जवळपास माणसे गंभीर, अतिगंभीर जखमी झाले आणि पाेलीस कर्मचाऱ्यांचा यात सर्वाधिक समावेश आहे. १२ हजार प्राणी आणि ४० हजारांवर पक्षी अतिगंभीर स्वरूपात जखमी झाले हाेते व यातील ७० ते ७५ टक्के पक्ष्यांनी प्राण गमावले असण्याची शक्यता रतुडी यांनी व्यक्त केली.
इतर कारणांची नाेंदच हाेत नाही
नायलाॅन मांजाने केवळ गळा कटून मृत्यू हाेताे असे नाही. अरविंदकुमार म्हणाले, मांजा अडकल्याने वाहनांचा अपघात हाेताे, मांजाच्या मागे धावताना बिल्डिंगवरून पडणे, वाहनांना धडकणे अशा कारणानेही मृत्यू हाेताे.
नायलाॅन मांजा पेटत्या विद्युत ताराला अडकल्याने करंट लागूनही प्राण गेले आहेत. जनावरांच्या पोटात जाऊनही मृत्यू होतो, अशा घटनांची नायलाॅन मांजाचे कारण म्हणून नाेंद हाेत नाही.
मनुष्यवधाचा गुन्हा व्हावा दाखल
अनेक वर्षापासून रतुडी यांच्या संघटनेद्वारे न्यायालयात लढा दिला जात आहे. गुरुवारी पुन्हा एकदा त्यांच्या टीमने डीसीपी यांची भेट घेत नायलाॅन मांजा विकरणारे व वापरणाऱ्यांवर सदाेष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.
मांजाची निर्मितीच बंद व्हावी म्हणून राष्ट्रपती, पंतप्रधान, मुख्यमंत्री, लाेकसभा अध्यक्ष अशा माननीयांना पत्र पाठविले आहे. जिल्हाधिकारी, पाेलीस आयुक्त, मनपा आयुक्त, प्रदूषण मंडळ, वनविभागाच्या अधिकाऱ्यांना भेटूनही त्यांनी कारवाईची मागणी केली आहे.