लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दिल्लीला ३ लाख ८० हजार रुपये किमतीचा ३७ किलो ४०० ग्रॅम गांजा घेऊन जात असलेल्या आरोपीला रेल्वे सुरक्षा दलाने रंगेहाथ अटक करून लोहमार्ग पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.रेल्वे सुरक्षा दलाचा जवान बी. बी. यादव यास रेल्वेगाडी क्रमांक १२७९१ सिकंदराबाद-दानापूर एक्स्प्रेसने गांजाची तस्करी होत असल्याची गुप्त माहिती मिळाली. ही माहिती त्याने आरपीएफचे वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त ज्योती कुमार सतीजा यांना दिली. त्यांनी निरीक्षक वीरेंद्र वानखेडे, उपनिरीक्षक दिलीप यादव, सहायक उपनिरीक्षक भुरासिंह बघेल, बी. बी. यादव, आर. के. यादव, नितेश ठमके, अर्जुन सामंतराय, गोपाल सिंह, नीळकंठ गोरे यांची चमू गठित केली. चमूने शुक्रवारी सायंकाळी प्लॅटफार्म क्रमांक १ वर पाहणी केली. यावेळी रेल्वेगाडी क्रमांक १२७९१ सिकंदराबाद-दानापूर एक्स्प्रेसच्या ए १ कोचसमोर एक व्यक्ती तिन बॅगसह आढळली. काही वेळानंतर ती मेन गेटजवळ जाऊन बसली. बॅगबाबत त्याला विचारणा केली असता समाधानकारक उत्तर दिले नाही. त्याच्या जवळील बॅगची बॅग स्कॅनरमध्ये तपासणी केली असता त्यात पॅॅकेटसारख्या वस्तू आढळल्या. त्याची अधिक चौकशी केली असता त्याने आपले नाव अजमत गुलाम रसुल अली (२३) रा. बी-२६४, जवाहर मोहल्ला, शशी गार्डन, दिल्ली सांगितले. बॅगमध्ये गांजा असल्याची माहिती त्याने दिली. रेल्वेगाडी क्रमांक १२६२५ केरळ एक्स्प्रेसने दिल्लीला जाणार होतो, असे त्याने सांगितले. बॅगची तपासणी केली असता त्यात गांजाची ११ पाकिटे आढळली. हा गांजा ३७ किलो ४०० ग्रॅम असून बाजारभावानुसार त्याची किंमत ३ लाख ८० हजार आहे. कागदोपत्री कारवाईनंतर आरोपीला गांजासह लोहमार्ग पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.
नागपूर रेल्वेस्थानकावर ३.८० लाखाचा गांजा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2018 12:49 AM
दिल्लीला ३ लाख ८० हजार रुपये किमतीचा ३७ किलो ४०० ग्रॅम गांजा घेऊन जात असलेल्या आरोपीला रेल्वे सुरक्षा दलाने रंगेहाथ अटक करून लोहमार्ग पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.
ठळक मुद्देआरोपीला अटक : रेल्वे सुरक्षा दलाची कारवाई