नागपूर : विधानसभेच्या कामठी मतदारसंघाच्या रिंगणात पाच वर्षांच्या अंतराने उतरलेले भाजपचे उमेदवार व प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या संपत्तीत तीनच वर्षांत ३९ टक्क्यांनी वाढ झाली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे बावनकुळे व त्यांच्या पत्नीच्या नावे ४८ कोटींहून अधिकची संपत्ती असतानादेखील बावनकुळे यांच्या नावाने वैयक्तिक कार नाही. त्यांनी निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या शपथपत्रातून ही बाब समोर आली आहे. तीन वर्षांत जमिनीचे दर वाढल्यामुळे संपत्तीच्या आकडा वाढल्याचे दिसून येत आहे.
२०२१ साली बावनकुळे यांनी विधानपरिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मतदारसंघातून निवडणूक लढविली होती. त्यावेळी बावनकुळे व त्यांच्या पत्नी ज्योती यांच्या नावे मिळून एकूण ९० लाखांहून अधिकची अचल संपत्ती होती, तर ३३ कोटी ८३ लाख ७७ हजार ११७ रुपयांची चल संपत्ती होती. मंगळवारी दाखल केलेल्या शपथपत्रानुसार बावनकुळे व त्यांच्या पत्नीच्या नावे एकूण २.६३ कोटींची चल संपत्ती आहे. तर ४५.९२ कोटींची अचल संपत्ती आहे.
अचल संपत्तीमध्ये बाबुळखेडा, सिंदी उमरी, चिचोली, कोराडी येथील १.४९ कोटींची शेतजमीन, सुरादेवी, कोराडी, नांदा येथील २० कोटींची बिगरशेती जमीन, महादुला-नांदा-कोराडी येथे २४ कोटींच्या वाणिज्यिक इमारत यांचा प्रामुख्याने समावेश आहे. केवळ चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे २ कोटी १० लाखांची अचल संपत्ती व ८६ लाख ७६ हजार रुपयांची चल संपत्ती आहे.
बावनकुळेंकडे स्वत:ची कार नाही
शपथपत्रातील माहितीनुसार, बावनकुळे व त्यांच्या पत्नीकडे मिळून २ कोटी ६३ लाख रुपयांची चल संपत्ती आहे. यात ३७ लाख रुपयांचे दागिने, ९ लाख ५३ हजार रुपयांची कार, यांचा प्रामुख्याने समावेश आहे. बावनकुळे यांच्या नावाने एकही वाहन नाही. एका कारची नोंदणी पत्नीच्या नावे आहे.
कर्जाचा आकडादेखील वाढला
२०१९ साली बावनकुळे व त्यांच्या पत्नीवर १७ कोटी ४२ लाख ५८ हजार २६५ इतक्या रकमेचे कर्ज होते. आता त्यात वाढ झाली असून बावनकुळे व त्यांच्या पत्नीवर २० कोटी २४ लाख रुपयांचे कर्ज आहे. तीन वर्षांत कर्जाचा आकडादेखील जवळपास पावणे तीन कोटींनी वाढला आहे. दररम्यान, बावनकुळे यांच्याविरोधात विविध प्रकारचे चार खटले प्रलंबित आहेत.
सात कोटींचे वार्षिक उत्पन्न
बावनकुळे व त्यांच्या पत्नीचे मिळून वार्षिक उत्पन्न ७.०३ कोटी इतके आहे. बावनकुळे यांचे वैयक्तिक वार्षिक उत्पन्न ४४.७१ लाख इतके आहे तर त्यांच्या पत्नीचे उत्पन्न ६.५८ लाख इतके आहे. बावनकुळे यांच्या उत्पन्नाचा स्त्रोत शेती असून त्यांच्या पत्नीचा उत्पन्नाचा स्त्रोत शेती व व्यवसाय हे दर्शविण्यात आले आहे.