कैलास निघाेट
लाेकमत न्यूज नेटवर्क
देवलापार : नागपूर जिल्ह्यात काेराेना प्रतिबंधक लसीकरणाला १ मार्चपासून सुरुवात करण्यात आली. या काळात रामटेक तालुक्यातील देवलापार ग्रामीण रुग्णालय, तसेच करवाही व हिवराबाजार या दाेन प्राथमिक आराेग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या ९२ गावांमधील ४५ ते ६० वर्षे वयाेगट व त्यापेक्षा अधिक वयाच्या नागरिकांची लसीकरण टक्केवारी किमान ७५ असायला हवी हाेती. मात्र, या भागात ४५ ते ६० वर्षे वयाेगटांतील केवळ ३९ टक्के नागरिकांनी साेमवार (दि. १०)पर्यंत लसीकरण करवून घेतले. त्यामुळे या वयाेगटातील नागरिकांनी तातडीने लसीकरण करवून घ्यावे, यासाठी प्रशासनाने युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केले आहेत.
हा संपूर्ण परिसर आदिवासीबहुल असून, या भागातील नागरिकांच्या लसीकरणाची साेय करवाही व हिवराबाजार या दाेन प्राथमिक आराेग्य केंद्रांतर्गत करण्यात आली आहे. यात देवलापार ग्रामीण रुग्णालयांतर्गत येणाऱ्या गावांचाही समावेश आहे. या भागात लसीकरणाचा वेग वाढविण्यासाठी तहसीलदार बाळासाहेब मस्के, खंडविकास अधिकारी प्रदीप ब्रह्मनाेटे, तालुका आराेग्य अधिकारी डॉ.चेतन नाईकवार, अप्पर तहसीलदार प्रेमकुमार आडे, ठाणेदार प्रवीण बाेरकुटे सरपंच शाहिस्ता पठाण, नितेश सोनवाणे, वीणा ढोरे, डॉ.सुधीर नाखले, विस्तार अधिकारी प्रभाकर चन्ने, शैलेश तभाने यांनी या भागातील लसीकरण केंद्र व गावांना भेटी देत व रॅली काढून लसीकरणाबाबत जनजागृती करायला सुरुवात केली आहे.
या भागातील शासकीय रुग्णालयांमध्ये काेराेना रुग्णांवर उपचार करण्याची साेय नाही. बेजबाबदारपणा व उपचारातील दिरंगाई, यामुळे काही रुग्णांनी जीव गमवावा लागला. त्यातच साेशल मीडियावर फिरणाऱ्या चुकीच्या संदेशांनी भर घातल्याने नागरिकांच्या मनात लसीकरणाबाबत माेठा गैरसमज निर्माण झाल्याने, या भागात लसीकरणाचा वेग संथ असल्याचे जाणकार व्यक्तींनी सांगितले. या मंडळींनी तरुण व ज्येष्ठ नागरिकांमध्ये लसीकरणाबाबत असलेला उत्साह लक्षात घ्यावा, असेही त्यांनी सांगितले. ही लस सुरक्षित असून, राेग प्रतिकारशक्ती वाढविण्यास मदत करीत असल्याची माहिती अनेक डाॅक्टरांनी दिली आहे.
....
तरुणांमध्ये उत्साह
देवलापार परिसरातील ४५ ते ६० वर्षे वयाेगटांतील नागरिकांमध्ये या लसीकरणाबाबत एकीकडे उदासीनता दिसून येत असून, दुसरीकडे १८ ते ४५ वर्षे वयाेगटांतील तरुण व नागरिकांमध्ये उत्साह असल्याचेही दिसून येते. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये या वयाेगटातील नागरिकांच्या लसीकरणाला सुरुवात झाली असली, तरी देवलापार परिसरात अद्याप सुरुवात झाली नाही. लस घेण्यासाठी ॲपवर ऑनलाइन नाेंदणी केल्याची माहिती या भागातील अनेक तरुणांनी दिली. या वयाेगटासाठी देवलापार परिसरात लसीकरण केंद्र सुरू करण्याची मागणीही अनेकांनी केली आहे.
...
चुकीच्या संदेशावर विश्वास
साेशल मीडियावर लसीकरणाबाबत विविध संदेश फिरत आहेत. यात बहुतांश संदेश तर्कविसंगत व चुकीचे असतात. बहुतांश नागरिक या संदेशावर विश्वास ठेवतात. त्यामुळे त्यांच्या मनात लसीकरणाबाबत भीती निर्माण झाली आहे, अशी माहिती काही जाणकार व्यक्तींनी दिली. या भागातील ६० वर्षांवरील नागरिकांसह शासकीय कर्मचाऱ्यांनी लसीकरण करवून घेतले आहे. यात कुणालाही लसीचे दुष्परिणाम जाणवले नाहीत. या महत्त्वाच्या बाबी या नागरिकांनी ग्राह्य धरायला हव्या.