विजय नागपुरे
कळमेश्वर : मागील चार महिन्यांपासून कळमेश्वर वनपरिक्षेत्रातील आदासा, बाजारगाव, कळमेश्वर बीट अंतर्गत येणाऱ्या परिसरातील ३९.८५९ हेक्टर जंगल जळाल्याच्या घटना घडल्या आहेत. लागलेल्या आगी या नैसर्गिक की मानवनिर्मित आहेत, त्यापेक्षा लोकसहभागातून आगी आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जंगल वाचेल तर प्राणी वाचवू शकू. याकरिता प्रत्येक नागरिकाने जबाबदारीने वागले पाहिजे, असे आवाहन वनपरिक्षेत्र अधिकारी अर्चना नौकरकर यांनी केले.
कळमेश्वर वनपरिक्षेत्र ४१६२.८३ हेक्टर क्षेत्रात विखुरले आहे. यात १०७८.९९ हेक्टर झुडपी जंगल, १४७३.४ हेक्टर राखीव वनक्षेत्र तर १६१०.४४ हेक्टरमध्ये संरक्षित वनक्षेत्र आहे. येथे विविध प्रजातीची झाडे बघावयास मिळतात. वनाच्या माध्यमातून मिळणाऱ्या उत्पन्नातून गोरगरीब, शेतकरी, शेतमजूर अशा अनेकांना रोजगार मिळतो. मोहफूल, तेंदूपत्ता, गौण खनिज या सगळ्या आर्थिक बाबीसोबतच स्वच्छ, नैसर्गिक वातावरण निर्मितीसाठी वनांची नितांत आवश्यकता आहे.
तालुक्यात निमजी, लिंगा बिट हे घनदाट जंगल म्हणून ओळखले जाते. कळमेश्वर वनपरिक्षेत्रात वाघासह इतरही तृणभक्षक वन्य प्राण्यांचा मोठ्या प्रमाणात अधिवास आहे. वनाच्या आणि वन्यजीवांच्या संरक्षण व संवर्धनासाठी वनाधिकारी व कर्मचारी कायम गस्त करीत असतात. वन्यप्राण्यांना पिण्यासाठी पाणी व चाऱ्याचे व्यवस्थापन करणे आणि नैसर्गिक अधिवास सुरक्षित ठेवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करतात.
यावर्षी कळमेश्वर वनपरिक्षेत्रात लागलेल्या आगीमध्ये आदासा उपक्षेत्रात मोहपा नियतक्षेत्रातील १.८१ हेक्टर, बाजारगाव उपक्षेत्रातील बाजारगाव, खैरी, धनकुंड नियतक्षेत्रातील २३.४८ हेक्टर तसेच कळमेश्वर उपक्षेत्रात कळमेश्वर व खैरी नियतक्षेत्रातील १४.५६९ हेक्टर जंगल आगुच्या भक्ष्यस्थानी पडले. यामध्ये वाळलेले गवत, पालापाचोळा, वन विभागाची रोपे जळून खाक झाली. आग आटोक्यात आणण्यासाठी वनपरिक्षेत्र अधिकारी अर्चना नौकरकर यांच्या मार्गदर्शनात क्षेत्र सहायक सुनील फुलझेले, विनोद कोल्हे, वनरक्षक जी. आर. मानकर, जी. जे. मेंढे, चनकापुरे, सोनशेटे, भोयर, वनमजूर रफिक मोहब्बे, बी. एस. बोरकर, विष्णू बनसोड, वाहन चालक श्रावण नागपुरे, मंगेश पांडे यांनी प्रयत्न केले.
मागील वर्षी लिंगा-लाढाई गावाशेजारील कक्ष क्रमांक १९२ संरक्षित जंगलाला आग लावण्यात आली होती. माहिती मिळताच बाजारगाव क्षेत्रसहायक विनोद कोल्हे व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळाकडे धाव घेत आग आटोक्यात आणली. हा वनवणवा नसून केवळ मोहफूल गोळा करण्यासाठी आग लावल्याचे तपासाअंती उघडकीस आले होते. यामुळे या राखीव वनातील ६.१० हेक्टर क्षेत्र जळून वन्यप्राण्यांचे खाद्य व जैवविविधता खाक झाली होती. याप्रकरणी तीन आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले होते.
--
कळमेश्वर वनपरिक्षेत्रांअंतर्गत वनाला आग लागू नये यासाठी येणाऱ्या सर्व कर्मचारी, अधिकारी, वनमजुरांचे जनजागृती विषयक प्रशिक्षण घेण्यात आले होते. आमचा प्रत्येक कर्मचारी दक्ष असल्यामुळे आगीच्या घटनेत घट झाली आहे.
- अर्चना नौकरकर
वनपरिक्षेत्र अधिकारी, कळमेश्वर