लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अंतराळात अतिशय महत्त्वाची घडामाेड मंगळवारी घडणार असून अंतराळप्रेमी व अभ्यासकांसाठी ही महत्त्वाची घटना असेल. शनिच्या भ्रमणादरम्यान ३ ऑगस्ट राेजी सूर्य व शनि ग्रहाच्या अगदी मध्ये पृथ्वी येणार आहे. म्हणजे या दिवशी पृथ्वीपासून शनिचे अंतर सर्वात कमी राहणार आहे. या दिवशी पश्चिमेला सूर्य मावळेल आणि पूर्वेला शनि उगवेल. त्याशेजारीच गुरु ग्रहाचीही हजेरी असेल. या आकर्षक ग्रहांना उघड्या डाेळ्यांनीही पाहता येईल पण ढगांमुळे वैदर्भीय खगाेलप्रेमींचा भ्रमनिरास हाेण्याची शक्यता आहे.
रमण विज्ञान केंद्राचे खगाेल शिक्षक महेंद्र वाघ यांनी या घटनेवर विस्तृत प्रकाश टाकला. ज्याप्रमाणे पृथ्वीला सूर्याभाेवती परिक्रमा पूर्ण करण्यासाठी ३६५ दिवस म्हणजे एक वर्ष लागते, त्याप्रमाणे शनि ग्रहाला सूर्याभाेवती एक परिक्रमा पूर्ण करण्यास ३० वर्षांचा कालावधी लागताे. सूर्यमालेतील सर्व ग्रह भ्रमंती करताना कधी विरुद्ध दिशेला तर कधी सूर्यापासून एकाच बाजूला असतात. त्यानुसार मागील महिन्यातच आपल्या पृथ्वीसह मंगळ व बुध ग्रह एका बाजूला हाेते, जे आता दूरदूर जात आहेत. या महिन्यात शनि, गुरु व पृथ्वी एकाच बाजूला आहेत. त्यातही शनि हा पृथ्वीच्या समान रेषेत राहणार आहे. सूर्यास्तानंतर सायंकाळी ७.४१ वाजता शनिचे दर्शन घडेल. त्यानंतर रात्री ९.३० वाजताच्या दरम्यान गुरुचेही दर्शन हाेईल. सूर्याेदय हाेताच पश्चिमेकडे लाेप पावतील. मात्र पूर्ण रात्र या तेजस्वी ग्रहांना अवकाशात बघता येणार आहे. शनिभाेवती असणाऱ्या आकर्षक रिंग मात्र टेलिस्काेपनेच बघता येतील.
- ऑगस्ट ते डिसेंबर २०२१ पर्यंत अवकाशात या शनी व गुरु ग्रहाचे निरीक्षण करता येणार आहे.
- तसे पृथ्वीच्या वेगवान गतीमुळे ही घटना दरवर्षी घडते. यावर्षीच्या तुलनेत २०२२ मध्ये दाेन आठवडे पुढे हा घटनाक्रम हाेईल. २०१६ ला ३ जून, २०१७ ला १५ जून, २०१८ ला २७ जून, २०१९ ला ९ जुलै तर २०२० ला २० जुलै राेजी ही घटना घडली.
- सर्वात जवळ असताना पृथ्वीपासून शनिचे अंतर ७४६ दशलक्ष मैल म्हणजे १.२७ अब्ज किलाेमीटर असेल. हे अंतर पृथ्वी व सूर्याच्या अंतराच्या ८ पट अधिक आहे. खगाेलीय युनिटमध्ये ८.५२ एयु.
- सर्वात दूर असताना १.७ अब्ज किलाेमीटर. पृथ्वी व सूर्याच्या अंतरापेक्षा हे अंतर ११ पट अधिक आहे.