गडकरी-फडणवीस-बावनकुळे यांच्या बालेकिल्ल्यातील नागपूर शिक्षक मतदारसंघाची जागा भाजपला गमवावी लागली. यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही जागा भाजप लढली असती तर निकाल वेगळा असता, अशी प्रतिक्रिया देत हे अपयश भाजपचे नसल्याची भूमिका मांडली आहे. मात्र, येथील महाविकास आघाडीचे उमेदवार सुधाकर अडबोले यांनी ७ हजारांपेक्षा अधिक मताधिक्य घेऊन नागो गाणार यांचा पराभव केला. या पराभवामुळे भाजपचा बालेकिल्ला असलेल्या नागपुरात गडकरी-फडणवीसांच्या गडाला हादरा बसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. मात्र, हा भाजपला पहिला पराभव नसून गेल्या तीन वर्षातील तिसरा पराभव आहे.
राज्यातील ५ विधानपरिषद मतदारसंघांपैकी भाजपला केवळ कोकणातील जागा जिंकता आली. त्यामुळे, भाजपच्या विजयापेक्षा पराभवाचीच जास्त चर्चा होत आहे. त्यातही, भाजप नेते केंद्रीयमंत्री नितीन गडकरी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा गड असलेल्या नागपुरातही भाजपला पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे, विरोधकांकडूनही टीका होत आहे. मात्र, कालचा पराभव हा एकमेव नसून निवडणुकांमध्ये भाजपला नागपुरात मिळालेला हा सलग तिसरा पराभव आहे.
नागपूर जिल्हा परिषदेच्या निवडणुकांमध्ये तीन वर्षांपूर्वी पराभव पत्कारावा लागला होता. नागपूरमधील एकूण ५८ जिल्हा परिषदांच्या जागांपैकी काँग्रेसला ३०, राष्ट्रवादीला १० आणि भाजपला १५ आणि इतर २ जागांवर उमेदवारांना विजय मिळाला होता. विशेष म्हणजे नितीन गडकरींच्या धापेवाडा गावांतही काँग्रसचे महेंद्र डोंगरे विजयी झाले होते. त्यानंतर, ऑक्टोबर २०२२ च्या ग्रामपंचायत निवडणुकीत अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत काँग्रेसने मोठा विजय मिळवला होता. विशेष म्हणजे १३ पैकी ९ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदी काँग्रेसला विजय मिळाला होता.आता, शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजप पुरस्कृत उमेदवाराला पराभव पत्कारावा लागला. त्यामुळे, गेल्या ३ वर्षात भाजपचा हा तिसरा पराभव असून गडकरी-फडणवीसांच्या गडात भाजप मजबूत नसल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात होत आहे.
पराभवावर काय म्हणाले बावनकुळे
या पराभवावर बोलताना भाजप प्रदेशाध्य चंद्रकांत बावनकुळे म्हणाले की, शिक्षक परिषदेचे उमेदवार नागो गाणार यांच्या दोन टर्म पूर्ण झाल्या होत्या. त्यामुळे यावेळी शिक्षक परिषदेने भाजपचा उमेदवार लढवावा, असा प्रस्ताव होता. मात्र, परिषदेने आधीच गाणार यांची उमेदवारी जाहीर केली. त्यानंतर भाजपने गाणार यांना पाठिंबा जाहीर केला. भाजपच्या प्रत्येक नेता व कार्यकर्त्याने परिश्रम घेतले. पण यश आले नाही याचे दु:ख आहे. या निकालावर पक्ष मंथन करेल, असेही त्यांनी सांगितले.