नागपूर : लॉकडाऊनपासून नागपूर ते दिल्ली व मुंबई दरम्यान सायंकाळची उड्डाणे बंद होती. दोन फ्लाईट आता २८ मार्चपासून सुरू होणार आहेत. आतापर्यंत सकाळी या दोन मार्गावर दोन फ्लाईट सुरू होते. २८ पासून दोन्ही फ्लाईट नियमित झाल्यानंतर नागपुरातील एअर इंडियाचे एकूण ४ फ्लाईट उड्डाण घेतील.
२८ मार्चपासून एआय ६४१ हे विमान दिल्ली येथून रात्री ११.३० वाजता रवाना होऊन मध्यरात्री १.३० वाजता नागपुरात पोहचेल. तर एआय ६२९ हे विमान मुंबईहून सायंकाळी ७ वाजता रवाना होऊन रात्री ८.३५ वाजता नागपुरात लॅण्ड होईल. त्याचबरोबर आतापर्यंत नागपुरातून दिल्लीला सुरू असलेले एआय ४६९ विमान आठवड्यातून सोमवारी, गुरुवारी व शनिवारी उड्डाण घेत होते. २८ मार्चपासून ते नियमित होणार आहे. पण हे विमान आता येताना व जाताना रायपूर विमानतळावरही लॅण्ड होणार आहे. तर आठवड्यातून दोन दिवस थेट सेवा आहे. यासंदर्भात प्रवासी एअर इंडियाच्या वेबसाईटवरून माहिती घेऊ शकतात. सकाळी दिल्ली व मुंबईसाठी विमान उपलब्ध असल्याने आणि सायंकाळीसुद्धा नियमित विमान असल्याने नागपूरकर सकाळी आपले काम संपवून त्याच दिवशी परत येऊ शकतात. दिल्लीसाठी आरटीपीसीआर टेस्ट महत्वाची असल्याने सध्या एअरलाईन्सला थोडी झळ बसत आहे.