मंगेश व्यवहारे/मुकेश कुकडे
नागपूर : महामार्ग कसा असावा, याचा आदर्श हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाने घालून दिला आहे. या महामार्गावरील नागपूर ते शिर्डी या ५२० किलोमीटरच्या पहिल्या टप्प्याचे रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समृद्धीवरून वाहन चालविताना पोटातील पाणीही हलत नसल्याचा दावा केला. त्यामुळे ‘लोकमत’ने पहिल्याच दिवशी ‘ऑन दी स्पॉट’ परिस्थिती पाहण्यासाठी नागपूर ते शिर्डी असा प्रवास केला अन् शानदार...जबरदस्त..अशी समृद्धीमय अनुभूती आली.
लोकार्पणानंतरची पहिलीच रात्र असल्यामुळे समृद्धीवर अनेक अडथळे येतील. पथदिवे सुरू राहणार नाहीत. आवश्यक तेथे सूचना फलक राहणार नाही, असे एक ना अनेक विचार मनात आले होते; परंतु तसे काहीच आढळून आले नाही. संपूर्ण प्रवास सुखकारक व सुरक्षित झाला. आम्ही नागपूर ते शिर्डी अंतर कुठेही न थांबता अवघ्या ४ तास २१ मिनिटांत पूर्ण केले. आम्ही शिवमडका झीरो पॉईंटपासून संध्याकाळी ६ वाजता शिर्डीकडे कूच केली. त्यानंतर १० किलोमीटर अंतरावरील टोल नाक्यावर कर चुकता करून १०० किलोमीटरवरील धामनगाव येथे अवघ्या ४३ मिनिटात पोहोचलो. त्यापुढील प्रवासही निर्धारित वेळेत पूर्ण केला. दरम्यान, समृद्धीवरील रिफ्लेक्टर वीज दिव्यांच्या माळेसारखे शेवटपर्यंत चमकत होते. वळणाची सूचना देणारे फलक दोन किलोमीटर आधीपासून सावध करीत होते. औरंगाबादजवळच्या बोगद्याला आकर्षक रूप देण्यात आले आहे. तो दूरूनच लक्ष वेधून घेतो. समृद्धीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे एकदा पथकर भरल्यानंतर शिर्डीपर्यंत कुठेच कर भरण्यासाठी थांबण्याची गरज नाही. त्यामुळे एकदा प्रवास सुरू केला की थेट आवश्यक तेथेच थांबू शकतो. वर्धा, अमरावती, मेहकर, जालना व औरंगाबाद येथील टोल नाक्यांवर आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे.
वाशिमपूर्वी रोडचे काम सुरू
वाशिमपूर्वी सुमारे ३५ किलोमीटर आधी रोडचे काम सुरू आहे. सध्या केवळ दोन लेन वाहनांसाठी खुल्या आहेत. येथून सुमारे पाच किलोमीटरपर्यंत वाहन सावकाश चालवावे लागते. या ठिकाणी रविवारी दोन कुत्र्यांचा वाहन अपघातात मृत्यू झाला होता.
ही काळजी घेणे आवश्यक
१ - समृद्धीवरील मोजकेच पेट्रोल पंप सुरू आहेत. त्यामुळे वाहनात इंधन पुरेशा प्रमाणात असल्याची खात्री करून घ्यावी.
२ - समृद्धीवर हॉटेल, धाबे, रेस्टॉरंट नाहीत. त्यामुळे वाहनामध्ये खाद्य पदार्थ व पाणी सोबत घेऊन जावे.
३ - वाहनाच्या टायरमधील हवा तपासून घ्यावी. सोबत स्टेपनी ठेवावी. वाहन बंद पडू नये, यासाठी आधीच आवश्यक तपासणी करून घ्यावी.
संस्मरणीय अनुभव
समृद्धी महामार्गावरून प्रवास करताना संस्मरणीय अनुभव मिळाला. हा रोड अतिशय उत्तम झाला आहे. आता शिर्डीला अत्यंत कमी वेळात पोहोचणे शक्य झाले आहे.
- राजेश धरमारे, मानेवाडा रोड, नागपूर.