लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दोन दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसाने गुरुवारी विदर्भाला जोरदार तडाखा दिला. वादळी पावसादरम्यान भंडारा, यवतमाळ व वाशिम जिल्ह्यात शेतकरी महिलेसह चौघांचा वीज कोसळून मृत्यू झाला. वीज कोसळल्याने बैल आणि शेळ्याही दगावल्या. वादळी पावसाने रब्बी धान, गहू, हरभरा, आंबा व भाजीपाल्याचे प्रचंड नुकसान झाले. घरांचीही पडझड झाली.
भंडारा जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यात महिलेसह दोघांचा बळी गेला. तालुक्यातील पाथरी या गावी दुपारी १२ वाजताच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह पाऊस सुरू झाला. शेतात काम करून घरीत परत जाण्यासाठी निघालेले तिघे पावसापासून बचावाकरिता आंब्याच्या झाडाखाली बसले. दुर्दैवाने या झाडावरच वीज कोसळली. यात महिला व पुरुष शेतकरी जागीच ठार झाले. मनीषा भारत पुष्पतोडे (३२) व प्रमोद मनिराम नागपुरे (४२) असे मृतांची नावे आहेत. महिलेचे सासरे आसाराम पुष्पतोडे (५५) हे सुदैवाने बचावले.
दुसरी घटना यवतमाळ जिल्ह्याच्या मुकुटबन येथील आहे. सकाळपासून वादळी पावसाला सुरुवात झाली. यादरम्यान तालुक्यातील बंदी वाढोणा या गावातील शेतकरी वसंता नरसिंग चव्हाण (३८) हे सकाळी ९:३०च्या सुमारास शेतात काम करीत असताना त्यांच्या अंगावर वीज कोसळली. उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. याशिवाय वाशिम जिल्ह्यात हळद उकळण्याचे काम करत असताना अंगावर वीज पडून एक शेतमजूर मृत्युमुखी पडला. ही घटना गुरुवारी दुपारी ४ वाजता रिसोड तालुक्यातील कवठा शिवारात घडली. मृत शेतमजुराचे नाव चंद्रविलास काठोळे (४०) असे आहे.
गोठ्याला आग, १० म्हशी होरपळल्यावादळामुळे झालेल्या घर्षणातून ठिणगी उडाल्याने साकोली शहरातील सिव्हिल वॉर्डातील गुरांच्या गोठ्याला आग लागून १० म्हशी होरपळल्या. वर्धा जिल्ह्यात हिंगणघाट तालुक्यातील खेकडी या गावी शेतात बांधलेला बैल वीज कोसळून ठार झाला. दुसरीकडे वाघोली या गावी शेतात चरत असलेल्या दोन शेळ्या वीज कोसळल्याने ठार झाल्या. शेळ्या चारत असलेले दामोदर वाटमोडे हे सुदैवाने बचावले. पुढचे दोन दिवस पावसाचे हवामान विभागाने पुढचे दोन दिवस अवकाळी पावसाची स्थिती कायम राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.