लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर-अमरावती राेडवरील वाडी येथे शुक्रवारी काेराेना रुग्णांवर उपचार हाेत असलेल्या ‘वेल ट्रिट हाॅस्पिटल’ला अचानक भीषण आग लागल्याने कमीतकमी चार रुग्ण दगावल्याची माहिती आहे. रात्रीच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. या वेळी रुग्णालयामध्ये काेराेना रुग्णांसह इतर आजारांचे जवळपास ५० रुग्ण उपचार घेत असल्याची माहिती आहे.
मृतांमधील तुळशीराम पाल या एका व्यक्तीची ओळख पटली असून, इतर तिघांची ओळख पटायची आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रात्री ९ वाजताच्या सुमारास वाडीतील पूजा चेंबर्स बिल्डिंगमध्ये सुरू असलेल्या वेल ट्रिट हाॅस्पिटलमध्ये तिसऱ्या व चाैथ्या माळ्यावर आयसीयूमध्ये अचानक आग लागली. एसीमध्ये बिघाड झाल्याने ही आग लागल्याचे सांगण्यात येत आहे. या वेळी तिसऱ्या माळ्यावर १७ रुग्ण तर चाैथ्या माळ्यावर ५ रुग्णांवर उपचार सुरू हाेते. संपूर्ण रुग्णालयात ५० च्या जवळपास रुग्ण असल्याची माहिती आहे. आग लागताच नर्सने एसीजवळील रुग्णांचे बेड हलविण्याचा प्रयत्न केला. माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पाेहोचल्या. अग्निशमन दलाचे जवान आणि रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या मदतीने रुग्णांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र ताेपर्यंत आगीच्या धुरामुळे श्वास काेंडल्याने अनेक जण अत्यवस्थ झाले. त्यातील तुळशीराम पाल नामक रुग्णाचा मृत्यू झाला. याशिवाय मेडिकलमध्ये आणताना तीन रुग्ण दगावले. रुग्णालयाच्या आयसीयूतील इतरही काही रुग्ण गंभीर असल्याचे सांगण्यात येत असून, मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
पळापळ-किंचाळ्यांनी शहारला परिसर
शहरातील सर्व यंत्रणा कोरोना संक्रमितांचे आणि मृतांचे आकडे मोजण्यात व्यस्त असतानाच शुक्रवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास वाडी, अमरावती महामार्गावर असलेल्या वेल ट्रिट या खासगी कोरोना रुग्णालयात अग्नितांडव माजल्याचे कानी पडले आणि सगळ्याच यंत्रणा सुन्न झाल्या. भंडारा येथील प्रसूती रुग्णालयातील आग प्रकरणाला पुन्हा एकदा उजाळा मिळाला.
वातानुकूलित यंत्राला अचानक लागलेली आग बघता बघता सर्वत्र पसरल्याने हॉस्पिटलमध्ये गोंधळ उडाला होता. ही माहिती क्षणार्धात स्थानिक नागरिकांपर्यंत पोहोचली आणि सगळेच मदतीला धावले. तोवर पोलीस व अग्निशमन दलाला ही माहिती हॉस्पिटल प्रशासनाकडून देण्यात आली होती. तोवर हॉस्पिटलमधील डॉक्टर, कर्मचारी व स्थानिक नागरिकांनी मिळेल त्या रुग्णाला बाहेर काढण्यास सुरुवात केली. यात अनेकांना किरकोळ जखमाही झाल्या. रुग्णांना वाचविताना पेटता वातानुकूलित यंत्र हातावर पडल्याने एक डॉक्टर व कर्मचारी जखमी झाला. दरम्यान अग्निशमन दलाच्या गाड्या पोहोचल्या आणि स्थिती नियंत्रणात आणण्याचे आटोकाट प्रयत्न केले. मात्र, तोवर काही रुग्णांचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले होते. रुग्णवाहिका, अग्निशमन दलाच्या गाड्यांच्या सायरनने सारा परिसर दणाणून निघाला होता. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तात्काळ गर्दी हटविण्यास सुरुवात केली आणि रुग्णांना मेयो, मेडिकल, सावंगी मेघे, लता मंगेशकर रुग्णालयात वळते केले. आपत्कालीन परिस्थितीत मेयो व मेडिकलमध्ये वार्ड सुसज्ज करण्यात आले होते.
जखमींना मदत करण्याची सूचना
वाडी येथील वेलट्रीट हॉस्पिटलला लागलेल्या भीषण आगीची तत्काळ दखल घेत क्रीडामंत्री सुनील केदार घटनास्थळावर पोहोचले व तातडीने सर्व रुग्णांना शिफ्ट करण्याची सूचना केली. विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांच्याशी संपर्क साधला व जखमींना तातडीने मदत करण्याची सूचना केली. आ. समीर मेघे यांच्याशीदेखील त्यांनी संपर्क साधून रुग्णांना सहकार्य करण्यास सांगितले.
दुर्दैवी घटना : गडकरी
केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी वाडीतील रुग्णालयातील अग्नितांडवाबाबत दु:ख व्यक्त केले आहे. ही अतिशय दुर्देैवी घटना असून रुग्णांच्या नातेवाईकांसोबत माझ्या संवेदना आहेत, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
नातेवाईकांना दिलासा मिळावा
कॉंग्रेसचे सचिव आशीष दुआ यांनी या घटनेबाबत दु:ख व्यक्त केले. आगीत जखमी झालेले रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना दिलासा मिळणे आवश्यक असून त्यासाठी जिल्हा प्रशासनाने हरतऱ्हेने सहकार्य केले पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले.