लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर: राज्य मंत्रिमंडळात चार महिलांना संधी देण्यात आली आहे. त्यातील तीन भाजपच्या तर एक अजित पवार गटाच्या आहेत. शिंदेसेनेकडून एकाही महिलेला संधी देण्यात आलेली नाही. विधानसभेत २१ महिला आमदार आहेत.
भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे विधान परिषदेच्या सदस्य असून त्यांना पक्षाने संधी दिली. मेघना बोर्डीकर या मराठवाड्यातील जिंतूर मतदारसंघातून दुसऱ्यांदा विधानसभेवर निवडून गेल्या आहेत. ज्येष्ठ नेते रामप्रसाद बोर्डीकर यांच्या त्या कन्या आहेत. माधुरी मिसाळ चौथ्यांदा विधानसभेवर निवडून गेल्या आहेत. त्यांचे पती चारवेळा पुण्यात नगरसेवक होते.
अजित पवार गटाच्या अदिती तटकरे या शिंदे सरकारमध्ये महिला व बालकल्याण मंत्री होत्या. आघाडी सरकारमध्ये त्या राज्यमंत्री होत्या. त्या श्रीवर्धन मधून पुन्हा विजयी झाल्या आहेत. अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आणि रायगडचे खासदार सुनील तटकरे यांच्या त्या कन्या आहेत. एकूण ४२ मंत्र्यांपैकी चार म्हणजे साधारण १० टक्के महिला मंत्री आहेत.
विधानसभेत आहेत २१ महिला आमदार
- यावेळी २१ महिला विधानसभेवर निवडून गेल्या. त्यात भाजपच्या १४ आमदार आहेत. त्यात, मेघना बोर्डीकर, मनीषा चौधरी, अनुराधा चव्हाण, श्रीजया चव्हाण, देवयानी फरांदे, सुलभा गायकवाड, सीमा हिरे, श्वेता महाले, मंदा म्हात्रे, माधुरी मिसाळ, नमिता मुंदडा, स्नेहा दुबे, मोनिका राजळे आणि विद्या ठाकूर यांचा समावेश आहे. त्यातील केवळ मेघना बोर्डीकर मंत्री झाल्या.
- अजित पवार गटाकडून अदिती तटकरे, सरोज अहिरे, सुलभा खोडके आणि सना मलिक चौघी जिंकल्या, त्यातील एकीला मंत्रिमंडळात स्थान मिळाले. शिंदेसेनेकडून मंजुळा गावित आणि संजना जाधव या दोन जणी तर काँग्रेसकडून ज्योती गायकवाड या एकट्याच विधानसभेत पोहोचल्या.