काटोल/उमरेड/बुटीबोरी : नागपूर जिल्ह्यात गत २४ तासात हत्येच्या चार घटना घडल्या आहेत. यात उमरेड आणि काटोलमध्ये क्षुल्लक कारणातून झालेल्या वादात दोन युवकांचा बळी गेला. यासोबतच बुटीबोरी परिसरातील बोरखेडी फाटक आणि मौदा पोलीस स्टेशन हद्दीतील सावळी फाटा येथे अनोळखी इसमाचा मृतदेह आढळून आला आहे. या दोघांचीही हत्या झाल्याचे पोलिसांच्या प्राथमिक चौकशीतून निष्पन्न झाले आहे.
काटोल शहरातील अर्जुननगर परिसरात बुधवारी दुपारी १.३० वाजताच्या सुमारास नीतेश ऊर्फ गिरीश लीलाधर गजबे (२१) या युवकाची हत्या करण्यात आली. या घटनेनंतर मारेकरी करण गवळी व अर्जुन माटे पसार झाले. करण आणि अर्जुन हे नागपूर येथे राहणारे आहेत. त्यांचे नीतेशशी संबंध असल्याने काही कार्यक्रमानिमित्त ते काटोल येथे आले होते. ३० मार्च रोजी त्यांच्यात वाद झाला होता. याचा वचपा काढण्यासाठी दोन्ही आरोपींनी नीतेशला बुधवारी (दि.३१) रोजी दुपारी १.३० वाजताच्या सुमारास त्याच्या घरासमोरील रस्त्यावर गाठत चाकूने भोसकले. स्थानिकांनी आरडाओरड केल्यानंतर मारेकरी घटनास्थळावरून पसार झाले. काटोल पोलीस फरार आरोपींचा शोध घेत आहेत.
उमरेड कावरापेठ येथील अक्की बारसमोर जुन्या क्षुल्लक भांडणाच्या कारणावरून मंगळवारी(दि.३०)रोजी रात्री ८.४५ वाजता दोघांनी एका तरुणाचा गेम केला. संदीप ऊर्फ संजय ईस्तारी खवास (३८, रा. कावरापेठ, उमरेड) असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी महादेव बाळकृष्ण मोहीनकर (२४, रा. कावरापेठ, उमरेड) आणि त्याचा मामेभाऊ विजय रवींद्र डहारे (२३, नागोबा चौक, कुही) या दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. मृत संजय खवास हा एका कारखान्यात कामगार होता. आरोपी महादेव मोहीनकर हा सुद्धा मोलमजुरी करतो. मृत संजय खवास आणि कावरापेठ येथील किशोर धोटे यांचे कौटुंबिक संबंध होते.
तिसरी घटना बोरखेडी फाटक परिसरात उजेडात आली. येथे अज्ञात आरोपीने एका अनोळखी व्यक्तीची दगडाने ठेचून हत्या केल्याचे बुधवारी (दि. ३१) सकाळी १० वाजताच्या सुमारास उघडकीस आले. अशोक विठ्ठल वंजारी (४३, रा. वॉर्ड क्र. ४, इंदिरानगर, बुटीबोरी) यांचा चुलत भाऊ सुरेश वंजारी हे बोरखेडी फाटक परिसरातील रेल्वे पुलाखाली साचलेल्या पाण्यात बैलांना पाणी पाजायला गेले असता, त्यांना एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडून असल्याचे आढळले. त्यांनी लगेच याबाबत अशोक वंजारींना सांगून पोलिसांना सूचना दिली. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र चौहान, ठाणेदार ओमप्रकाश कोकाटे, एपीआय सतीश सोनटक्के यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. मृत व्यक्ती अंदाजे ३० ते ३५ वर्षे वयोगटातील होता.
चौथी घटना मौदा पोलीस स्टेशन हद्दीतील सावळी फाटा उजेडात आली. येथे अज्ञात आरोपीने अनोळखी व्यक्तीची हत्या करून पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह जमिनीत पुरला. पोलिसांच्या माहितीनुसार गुणाकर कवडूजी इंगोले (५२, रा. सावळी, ता. कामठी) यांना सावळी फाटा परिसरात दुर्गंधी आल्याने त्यांनी याबाबत मौदा पोलिसांना सूचना दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून पाहणी केली असता, अंदाजे ३० ते ३५ वयोगटातील अनोळखी व्यक्तीचा मृतदेह जमिनीत पुरल्याचे आढळून आले. याप्रकरणी मौदा पोलिसांनी भादंवि कलम ३०२, २०१ अन्वये गुन्हा नोंदविला आहे.