नागपूर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत लसीकरणाअभावी गंभीर रुग्णांचे प्रमाण वाढले होते. परंतु आता लसीकरणानंतर कुटुंब पॉझिटिव्ह येत असलेतरी त्यांच्यामध्ये गंभीर लक्षणे दिसून येत नाहीत. शनिवारी चंद्रनगरातील एकाच कुटुंबातील तीन तर रविवारी नरेंद्रनगरातील एकाच कुटुंबातील आणखी तीन असे चार सदस्य पॉझिटिव्ह आले. यांना लक्षणे नसल्याने आमदार निवासात दाखल केले आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला ‘डेल्टा व्हेरियंट’ कारणीभूत ठरला. ‘डेल्टा प्लस’च्या तुलनेत हा विषाणू अधिक धोकादायक असल्याने जानेवारी ते जुलै दरम्यान तब्बल ३ लाख ६९ हजार ११८ कोरोनाबाधित आढळून आले. आजही नागपूरकरांमध्ये हा ‘व्हेरियंट’ आहे. परंतु लसीकरणामुळे त्याचा प्रभाव दिसून येत नसल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. प्राप्त माहितीनुसार, शनिवारी चंद्रनगरातील ७१ वर्षीय पुरुष तर ६६ व १९ वर्षीय महिला असे तीन पॉझिटिव्ह आले. याच दिवशी नरेंद्रनगर येथील १९ वर्षीय तरुण पॉझिटिव्ह आला. रविवारी त्याच्या कुटुंबातील ३५ वर्षीय पुरुष, ३२ वर्षीय महिला व त्यांची ४ वर्षांची मुलगी पॉझिटिव्ह आली. मुलगी सोडल्यास तरुणाचा पहिला डोस तर पुरुष आणि महिलेचे दोन्ही डोस झाले आहेत. लसीकरणामुळे गंभीरता टाळता येत असल्याचे हे ताजे उदाहरण असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
-नरेंद्रनगरातील १२२ नागरिकांचा अहवाल निगेटिव्ह
नरेंद्रनगरात एकाच घरात चार रुग्ण पॉझिटिव्ह आल्याने मनपाच्या आरोग्य पथकाने आजूबाजूच्या घरातील जवळपास १२२ नागरिकांच्या नमुन्यांची तपासणी केली. त्याचा अहवाल आज निगेटिव्ह आला. यामुळे आरोग्य यंत्रणेनेही सुटकेचा नि:श्वास टाकला.