नागपूर : सूर्यवंशी श्रीराम, सीतामाई, परमभक्त श्री हनुमान, शरयू तीर, रामसेतू, मंगल तोरण, अक्षता कलश अशा या प्रतिमांसह अयोध्येत श्रीरामाची प्राण प्रतिष्ठा व्हावी यासाठी ५०० वर्षे ज्यांनी संघर्ष केले, त्या महाराणी अहिल्याबाई होळकर, बाळासाहेब ठाकरे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रतिमा रांगोळीच्या माध्यमातून साकारत १०० कलाकारांनी आपली कला श्रीरामचरणी अर्पण केली.
अयोध्येतील श्रीराममूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्ताने इंटरनॅशनल परफॉर्मिंग आर्ट फेस्टिवल (आयपीएएफ), उत्तिष्ठ भारत आणि सिद्धिविनायक फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने बजाजनगर येथील बास्केटबॉल मैदानावर ही महारांगोळी साकारण्यात आली. संस्कार भारतीचे ज्येष्ठ कार्यकर्ते चंद्रकांत घरोटे यांच्या मार्गदर्शनात हर्षल कावरे, मोहिनी माकोडे, दीपाली हरदास यांच्यासह एकूण १०० कलाकारांनी १०० किलो पांढरी व ४०० किलो विविधरंगी रांगोळीचा वापर करीत सलग सात तास अथक परिश्रम करीत ४ हजार चौ.फुटाची सुरेख रांगोळी रेखाटली.
या महारांगोळीचे उद्घाटन सोमवारी सामाजिक कार्यकर्ते मनसुखभाई पटेल यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी श्री सिद्धिविनायक सेवा फाउंडेशनचे अध्यक्ष संदीप जोशी, इंटरनॅशनल परफॉर्मिंग आर्ट फेस्टिव्हल (आय.पी.ए.एफ.) चे सीईओ श्याम पांडे, चंदूजी घरोटे आदी मान्यवर उपस्थित होते. मूळ अयोध्या येथील रहिवासी श्याम पांडे म्हणाले, नागपूरवासी आज प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी अयोध्येत जाऊ शकत नसल्यामुळे आम्ही रांगोळीच्या माध्यमातून अयोध्या येथे साकारली आहे. हा उपक्रम हिंदू चेतनेला आम्ही समर्पित करतो. चंदूजी घरोटे यांनी या उपक्रमाबद्दल माहिती सांगताना संस्कार भारतीच्या कलाकारांनी आपली कला श्रीरामचरणी समर्पित केल्याची भावना व्यक्त केली.