नागपूर विद्यापीठ : संलग्नीकरण व ‘एलईसी’साठी पुढाकारच नाही लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने सहकार्य न करणाऱ्या महाविद्यालयांवर कारवाईस सुरुवात केली आहे. दोन आठवड्यांअगोदर प्रवेश गोठविण्यात आलेल्या ११९ महाविद्यालयांची यादी विद्यापीठाने जारी केली होती. आता आणखी ४० महाविद्यालयांवर विद्यापीठाने प्रवेशबंदी लावली आहे. संलग्नीकरणासाठी अर्ज न करणे तसेच ‘एलईसी’ची (लोकल इन्क्वायरी कमिटी) प्रक्रिया न राबविल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. आतापर्यंत एकूण १५९ महाविद्यालयांची यादी विद्यापीठाने जाहीर केली आहे. नागपूर विद्यापीठात ६०१ संलग्नीत महाविद्यालये आहेत. यातील ११९ महाविद्यालयांनी गेल्या तीन वर्षांपासून संलग्नीकरण सुरू राहावे किंवा नूतनीकरणासाठी अर्ज सादर केलेले नव्हते. यातील अनेक महाविद्यालये अनेक वर्षांपासून केवळ कागदांवरच आहेत. नागपूर विद्यापीठाने वारंवार या महाविद्यालयांशी पत्रव्यवहार केला. मात्र काहीही उत्तर मिळाले नाही. १८ महाविद्यालये बंद करण्याचे प्रस्ताव विद्यापीठाकडे आले. मात्र इतर ठिकाणाहून काहीच संपर्क न झाल्यामुळे १०१ महाविद्यालयांवर तत्काळ प्रवेशबंदी लागू करण्यात आली होती. आता आणखी १३ महाविद्यालयांवर प्रवेशबंदी लावण्यात आली आहे. महाविद्यालयांत नियमांनुसार प्राध्यापक तसेच इतर सोई-सुविधा आहेत की नाही याची तपासणी करण्यासाठी विद्यापीठातर्फे ‘एलईसी’ नेमण्यात येते. महाविद्यालयांना संबंधित समितीला बोलवावे लागते.
४० महाविद्यालयात प्रवेशबंदी
By admin | Published: June 21, 2017 2:13 AM