६० टक्के काम पूर्ण, कोविडमुळे उशीर झाल्याचा दावा
आनंद डेकाटे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महाराष्ट्रातील सर्वांत मोठा पायाभूत प्रकल्प समजला जाणाऱ्या समृद्धी महामार्गाचा नागपूर ते शिर्डी हा टप्पा येत्या डिसेंबरमध्ये वाहतुकीसाठी खुला होईल, असा दावा सार्वजनिक उपक्रमांचे बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी केला असला तरी प्रत्यक्षात नागपूरकरांना या नव्या मुहूर्ताचा लाभ घेता येणार नाही. शहराच्या बाह्य रिंगरोडवरील शिवमडका ते वर्धा जिल्ह्याच्या सीमेवरील खडकी या ३१ किलोमीटरचे काम ६० टक्के पूर्ण झाले असून, ४० टक्के शिल्लक आहे. सध्याच्या कामाची गती पाहता येत्या तीन महिन्यांत पूर्ण होण्याची अजिबात शक्यता नाही. तसेही एमएसआरडीसीने नवी डेडलाईन निश्चित केलेली नाही.
राजधानी मुंबई व उपराजधानी नागपूर जोडणाऱ्या ७०१ किमी लांबीच्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या नागपुरातील पहिला टप्पा हा ३१ किमीचा आहे. मे. मेघा इंजिनीअरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर लि. ही कंपनी हे काम पाहत आहे. कंपनीचा आजवरचा इतिहास चांगला आहे. ही कंपनी नावाजलेली असून नागपुरातील त्यांच्या कामाच्या दर्जाबाबत कुठलीही तक्रार नाही. तसेच या प्रकल्पाला नागपुरात कुणीही विरोधसुद्धा केला नाही. असे असले तरी नागपुरातील पहिल्या टप्प्याचे काम अजूनही ४० टक्के शिल्लक आहे. कोरोना संकटामुळे काम वेळेत पूर्ण होऊ शकले नाही, असा एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्यांचा दावा आहे. बाधितांसाठी शिबिराची व्यवस्था केल्यामुळे कोरोना संकटातही मजूर उपलब्ध होते. परंतु ऑक्सिजनअभावी फेब्रिकेशनचे काम राहिले. त्यामुळे कामाला उशीर झाला, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
----------------
- बॉक्स
- शेतकरी मोबदल्याबाबत समाधानी
समृद्धी महामार्गासाठी संपादित केलेल्या जमिनींच्या मोबदल्याबद्दल नागपुरातील शेतकरी समाधानी आहेत. अनेकांना शासकीय दराच्या पाचपट मोबदला मिळाला. त्यामुळे या प्रकल्पाला विरोध झाला नाही.
- बॉक्स
अशी आहे प्रगती
स्ट्रक्चरचा प्रकार एकूण संख्या पूर्ण झाले प्रगतिपथावर असलेले
उड्डाणपूल ४ - ० - ४
मोठे पूल १ - ० - ०
छोटे पूल १८ - १० - ८
- बॉक्स
रेल्वे ५४ - ५३ - १
--------------------------
एकूण रचना १९९ - १४० - ५९
---------------