लाेकमत न्यूज नेटवर्क
भिवापूर : पाेलिसांच्या पथकाने शुक्रवारी (दि. ३) मध्यरात्री उमरेड-चिमूर (जिल्हा चंद्रपूर) मार्गावरील सालेभट्टी (चाेर) शिवारात कारवाई करीत देशीदारूची अवैध वाहतूक करणारी बाेलेराे पकडली. यात चालकास अटक करण्यात आली असून, त्याच्याकडून देशीदारूच्या ४० पेट्या व वाहन असा एकूण आठ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला, अशी माहिती ठाणेदार महेश भाेरटेकर यांनी दिली.
सुंदरसिंग हरनामसिंग जुनी (३८, रा. बिडगाव, नागपूर) असे अटक करण्यात आलेल्या आराेपीचे नाव आहे. सुंदरसिंग काही महिन्यापासून ठाणा, ता. उमरेड येथे राहताे. भिवापूरहून चंद्रपूर जिल्ह्याच्या दिशेने दारूची वाहतूक केली जात असल्याची माहिती गस्तीवर असलेल्या पाेलिसांना मिळाली हाेती. त्यामुळे त्यांनी उमरेड-चिमूर मार्गाची पाहणी केली.
यात त्यांना एमएच-४०/एआर-६१९२ क्रमांकाची बाेलेराे चंद्रपूर जिल्ह्याच्या दिशेने जाताना आढळून येताच त्यांनी ही बाेलेराे सालेभट्टी (चाेर) शिवारात अडविली आणि झडती घेतली. या वाहनात त्यांना देशीदारूच्या ४० पेट्या आढळून आल्या. ती दारूची अवैध वाहतूक असल्याचे चाैकशीत स्पष्ट हाेताच पाेलिसांनी वाहनचालक सुंदरसिंग यास अटक केली. शिवाय, त्याच्याकडून दारू व वाहन जप्त केले.
या कारवाईमध्ये १ लाख ५३ हजार ६०० रुपये किमतीची दारू आणि ६ लाख ४६ हजार ४०० रुपये किमतीचे वाहन असा एकूण आठ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी भिवापूर पाेलिसांनी गुन्हा नाेंदवून तपास सुरू केला आहे. ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक प्रकाश चंगोले, प्रकाश आलम, उमेश झिंगरे, नागेश वाघाडे, संदेश रामटेके यांच्या पथकाने केली.
040921\1825-img-20210904-wa0066.jpg
दारूसाठा असलेले वाहन व आरोपीसह कारवाई करणारे पोलीस