जगदीश जोशी
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : साखरेच्या व्यवसायात गुंतवणूक केल्यास भरपूर नफा मिळवून देतो, असे आमिष दाखवून व्यापाऱ्यांना ४० कोटी रुपयांचा चुना लावणाऱ्या टोळीविरोधात आर्थिक शाखेत गुन्ह्याची नोंद झाली आहे. पोलिसांनी साखरेच्या दलालाला अटक केली आहे. तक्रारीच्या सव्वा वर्षानंतर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
गांधीबाग निवासी ६२ वर्षीय दिलीप जैन धान्याचे व्यापारी आहे. २०१९ मध्ये आरोपी अमर खनवानी, पंकज सोमय्या, तुलसीदास सोमय्या व उमाकांत ऊर्फ उमेश सोमय्या जैन त्यांच्याकडे आले. त्यांनी स्वत:ला सोलापूरच्या गोकुल शुगर इंडस्ट्रीजचे सुपर स्टॉकिस्ट सांगून आमच्यासोबत व्यवसाय केल्यास भरपूर लाभ होईल, असे सांगितले. त्यांनी सांगितले की, गोकुल शुगर इंडस्ट्रीजमधून कमी किमतीत साखरेचा पुरवठा होतो, साखर विकून भरपूर नफा मिळू शकतो. जैन यांनी डिसेंबर २०१९ मध्ये अमर खनवानी यांच्यासोबत ५० ते १०० टन साखरेचा व्यवहार केला. ज्यात त्यांना नफाही झाला. त्यामुळे जैन यांचा आरोपीवर विश्वास निर्माण झाला. ते खनवानी व सोमय्या यांच्या सांगण्यानुसार साखर खरेदी करू लागले. सोमय्या यांचे बाजारपेठेत नाव असल्याने जैन यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला.
खनवानी याने जैन यांची साखर एका मोठ्या ब्रॅण्डच्या डेअरी कंपनीला विकल्याचे सांगितले. जैन यांनी जेव्हा त्या कंपनीकडे विचारणा केली तेव्हा कळले की, खनवानी यानेही त्या कंपनीकडून साखर खरेदीसाठी पैसे घेतल्याचे लक्षात आले. जैन यांनी अमर खनवानी, सोमय्या परिवार व गोकुल शुगर इंडस्ट्रीजचे व्यवस्थापकीय संचालक दत्ता शिंदे यांनी सांगितल्यानुसार साखर खरेदी करण्यासाठी ४ कोटी ११ लाख रुपये गुंतविले होते. मार्च २०२० मध्ये लॉकडाऊन लागल्यानंतर आरोपी जैन यांना साखरेचा पुरवठा करण्यास अथवा पैसे परत करण्यास टोलवाटोलवी करीत होते. जैन यांच्याबरोबरच इतवारी व पूर्व नागपुरातील अनेक व्यापाऱ्यांनी आरोपींनी सांगितल्यानुसार गुंतवणूक केली होती. आरोपींनी व्यापाऱ्यांकडून ४० ते ५० कोटी रुपये गोळा केल्याची माहिती आहे. यासंदर्भात जैन यांनी २०२० मध्ये आर्थिक शाखेकडे तक्रार केली होती. परंतु, पोलिसांनी चौकशी फार गांभीर्याने केली नाही. त्यामुळे दोन आरोपींनी न्यायालयातून जामीन मिळविला. जैन यांनी पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांच्याकडे घटनेची तक्रार केली. त्यानंतर फसवणुकीचा गुन्हा दाखल करून आरोपी अमर खनवानी यांना अटक केली.
- आरोपींकडून धमकी, आत्महत्येचे नाटक
या फसवणुकीचा भंडाफोड झाल्यानंतर आरोपींनी पीडित व्यापाऱ्यावर दबाव निर्माण केला. एका आरोपीने आत्महत्येचे नाटक करून रुग्णालयात भरती झाला. तो पीडित व्यापाऱ्यालाच आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्या प्रकरणात धमकी देऊ लागला. या प्रकरणात ज्या व्यापाऱ्यांनी रोख रक्कम दिली, त्यांनी चुप्पी साधल्याने सव्वा वर्षापूर्वी पोलीस या प्रकरणात गुन्हा दाखल करू शकले नाही.
- २० ते २५ व्यापाऱ्यांना लावला चुना
सूत्रांच्या माहितीनुसार २० ते २५ व्यापाऱ्यांना आरोपींनी चुना लावला आहे. सव्वा वर्षानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर व्यापारी तक्रार करण्यास पुढे येत नाही. यातील काही व्यापाऱ्यांना मूळ रक्कम मिळाली आहे. एका व्यापाऱ्याने गुंतवणुकीच्या बदल्यात संपत्तीचा व्यवहार केला आहे. गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी अमर खनवानी याला अटक केली आहे. अन्य आरोपींबाबत पोलिसांची भूमिका शिथिल दिसते आहे.