लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहरातील रस्त्यांची चाळण झाली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. खड्डे बुजवणे, डांबरीकरण, पुनर्निर्माण यासाठी ४० कोटींचा निधी लागणार आहे. मनपा अर्थसंकल्पात रस्ते निर्माण व दुरुस्तीसाठी असलेली तरतूद संपली आहे. त्यामुळे इतर कामांचा निधी यासाठी वळता करता यावा, याकरिता मनपातील सत्तापक्षाने निधी पुनर्नियोजनाला सुरुवात केली आहे.
महापौर दयाशंकर तिवारी यांनी काही दिवसांपूर्वी सभागृहात निधी पुनर्नियोजनाचे निर्देश दिले होते. तर मागील दोन वर्षात रस्त्यांची कामे झालेली नाहीत. त्यामुळे शहरातील रस्त्यांवर जागोजागी खड्डे पडले आहेत. पावसाळा संपताच खड्डे बुजविण्याला सुरुवात करणार असल्याची माहिती आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी दिली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, सिमेंट रोडसाठी ९० कोटींची तरतूद केली होती. यातील ७५ कोटी कर्ज स्वरुपात तर १५ कोटी मनपा निधीतून उपलब्ध करावयाचे होते. परंतु, सिमेंट रोडची कामे सुरू झालेली नाहीत. त्यामुळे कर्जाची गरज पडणार नाही. उर्वरित १५ कोटींचे पुनर्नियोजन केले जाणार आहे.
सांस्कृतिक कार्यक्रम, क्रीडा स्पर्धा आयोजनावर बंदी आहे. हा निधी रस्ते दुरुस्तीसाठी उपलब्ध होऊ शकतो. या वर्षाच्या अर्थसंकल्पात डांबरीकरण, रस्ते दुरुस्तीसाठी ५० कोटी व रस्ते बांधकामांसाठी १० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. याबाबतच्या फाईल मंजूर करण्यात आल्या आहेत. पावसाळा संपताच या कामांना सुरुवात केली जाणार आहे.
...
२८ कोटींच्या फाईल तयार
रस्ते दुरुस्ती, डांबरीकरणाच्या २८ कोटींच्या फाईल तयार आहेत. मात्र, निधीअभावी मंजुरी मिळालेली नाही. यात प्रामुख्याने सत्तापक्षाच्या नगरसेवकांच्या फाईलचा समावेश आहे. निधी पुनर्नियोजनाला एक ते दीड महिना लागणार आहे. दरम्यान, विधान परिषद निवडणुकीची आचारसंहिता लागण्याची शक्यता असल्याने पुनर्नियोजन केले तरी कामे सुरू होण्याची शक्यता कमीच आहे.
...
निधीचे पुनर्नियोजन करणार - भोयर
शहरातील रस्ते दुरुस्तीसाठी निधीची गरज आहे. २८ कोटींच्या फाईल तयार आहेत. अजूनही फाईल मंजुरीसाठी येणार आहेत. याचा विचार करता ४० कोटींची गरज भासेल. यासाठी पुनर्नियोजनाची प्रक्रिया लवकरच पूर्ण करणार असल्याची माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष प्रकाश भोयर यांनी दिली.