चंद्रशेखर बावनकुळे : कोराडीत अपारंपरिक ऊर्जा संवर्धन प्रदर्शनकोराडी : अपारंपरिक ऊर्जा संवर्धनासाठी राज्यात सौर ऊर्जा धोरण तयार करण्यात येत असून आगामी पाच वर्षात १४ हजार ४०० मेगाव्हॅट वीज निर्मितीसह ४० लाख कृषिपंप सौर ऊर्जेवर आणण्याचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम राबविण्यात येणार असल्याची घोषणा ऊर्जा व नवीकरणीय ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी केली.महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण (महाऊर्जा) व श्री महालक्ष्मी जगदंबा संस्था, कोराडी यांच्या संयुक्त विद्यमाने अपारंपरिक ऊर्जा व ऊर्जा संवर्धन प्रदर्शनाचे उद्घाटन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी महालक्ष्मी जगदंबा देवस्थानचे दयाराम तडसकर, सरपंच अर्चना मैंद, महादुल्याच्या नगराध्यक्ष सीमा जयस्वाल, उपाध्यक्ष राजेश रंगारी, महाऊर्जाचे महाव्यवस्थापक पुरुषोत्तम जाधव, उमाकांत पांडे, हेमंत कुलकर्णी तसेच ऊर्जा संवर्धनचे हेमंत पाटील आदी उपस्थित होते. सौर ऊर्जेच्या माध्यमातून वीज देयकामध्ये ५० टक्के बचत होत असल्यामुळे सौर ऊर्जेसह अपारंपरिक ऊर्जेच्या वापरासाठी शासनाने नवीन धोरण ठरविले असल्याचे सांगताना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, शेतकऱ्यांच्या शेतात पाणी असूनही वीज नसल्यामुळे पीक वाचवू शकत नाही याच नैराश्यातून शेतकऱ्यांच्या बहुतांश आत्महत्या होत असल्याने अशा दहा हजार शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना अत्यंत अल्पदरात सौर कृषिपंप देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
४० लाख कृषिपंप सौर ऊर्जेवर आणणार
By admin | Published: October 06, 2016 3:07 AM