नागपूर : नागपुरातील सीमाशुल्क विभागाच्या एअर इंटेलिजन्स युनिटने (एआययू) मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारावर विमानतळावर सोन्याची तस्करी करण्याचा प्रयत्न उधळून लावला. या कारवाईनुसार एआययूने तस्करी करून आणण्यात येत असलेले जवळपास ७०० ग्रॅम सोने गो एअरच्या मुंबईवरून नागपुरात आलेल्या फ्लाइट क्रमांक जी ८-९५४ च्या कॅबिन टॉयलेटमधून जप्त केले आहे. या सोन्याची किंमत ४० लाख ४९ हजार ५०० रुपये आहे. हे विमान फुकेटवरून मुंबईला आले होते. त्यानंतर, हे विमान मुंबईवरून नागपुरात आले.
गो एअरच्या विमानातून सोन्याची तस्करी होत असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर नागपूरच्या सीमा शुल्क विभागाचे आयुक्त अभय कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अतिरिक्त आयुक्त पीयूष भाटी यांच्या निर्देशानुसार, नागपूर विमानतळाचे सहायक आयुक्त अविनाश पांडे यांच्या नेतृत्वात जाळे टाकण्यात आले. या अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात नागपूर सीमाशुल्क विभागाच्या पथकाने दोन संशयित विमान प्रवाशांना थांबवून त्यांची चौकशी केली. त्यांनी दिलेल्या माहितीवरून, विमानाच्या कॅबिन टॉयलेटमधून जवळपास ७०० ग्रॅम सोने जप्त करण्यात आले. या पथकात निरीक्षक दीपक सोनटक्के, अविनाश पराते, अविनाश खोब्रागडे, राजेश नवलाखे आणि मनिष पंढरपूरकर यांचा समावेश होता. या प्रकरणाचा तपास सीमाशुल्क विभागाने सुरू केला आहे. तस्करीचा असाच प्रयत्न नागपूर सीमाशुल्क विभागाने १० जानेवारी, २०२३ रोजी निष्फळ करून १.७३ किलो सोने जप्त केले होते.
तस्करांच्या निशाण्यावर इंटरनॅशनल फ्लाइट
सोन्याच्या तस्करीसाठी तस्करांकडून इंटरनॅशनल फ्लाइटचा वापर करण्यात येत आहे. या फ्लाइट नंतर डोमेस्टिक फ्लाइटमध्ये रूपांतरित होतात. अशा फ्लाइटमुळे तस्करांना इंटरनॅशनल एअरपोर्टवर सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांच्या तपासणीतून बचाव करण्याची संधी मिळते, परंतु नागपूरच्या सीमाशुल्क विभागाने सतर्कता बाळगून इंटेलिजन्स आणि डाटाचे विश्लेषण करून नागपूर विमानतळावर सोन्याची तस्करी पकडली आहे.