लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर : काँग्रेस नेते राहुल गांंधी यांनी काढलेल्या भारत जोडो अभियानात सहभागी झालेल्यापैकी ४० संघटना या नक्षलवाद्यांनी फ्रंटल संघटना म्हणून ‘नेम’ केलेल्या आहेत. २०१२ मध्ये ज्या फ्रंटल संघटनांना तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी ‘नक्षल संघटना’ म्हणून घोषित केले होते, या त्याच संघटना आहेत. निवडणुकीत परकीय शक्तींचा हस्तक्षेप होत असून टेरर फंडिंगचाही वापर झाला, असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला.
राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, त्यांना संवैधानिक संस्थांविषयी लोकांच्या मनात संशय निर्माण करून अराजकता निर्माण करायची आहे.
अधिवेशन संपताच लाडक्या बहिणींना डिसेंबरचा हप्ता
हिवाळी अधिवेशन संपताच लाडकी बहिणींच्या खात्यात डिसेंबरचा हप्ता जमा होणार आहे. महायुतीने तरुण, वृद्ध, वंचितांसाठी ज्या योजना चालविण्याचे आश्वासन दिले आहे, त्या केवळ चालवल्या जाणार नाहीत, तर कोणतीही योजना बंद पडू दिली जाणार नाही, असे आश्वासन मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले. लाडकी बहीण योजनेतील पात्रता अटी बदलल्या जातील, हा विरोधकांचा आरोपही त्यांनी फेटाळून लावला. ते म्हणाले, निकष बदलण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.