विजय नागपुरे
लाेकमत न्यूज नेटवर्क
कळमेश्वर : तालुक्यात एकूण ७०च्या आसपास पाेल्ट्री फार्म असून, यातील २५ फार्मची पशुसंवर्धन विभागाकडे नाेंद आहे. ४०पेक्षा अधिक पाेल्ट्री फार्मची शासन दप्तरी नाेंद नाही. या फॉर्ममध्ये १० लाखांपेक्षा अधिक काेंबड्या आहेत. तालुक्यात मृत्युमुखी पडणाऱ्या काेंबड्यांची संख्या वाढत असताना नाेंदणी नसलेल्या पाेल्ट्री फार्मबाबत पशुसंवर्धन विभाग अनभिज्ञ असल्याचेही दिसून आले.
पशुसंवर्धन विभागाने मृत काेंबड्यांचे नमुने तपासणीसाठी पुणे शहरातील प्रयाेगशाळेत पाठविले हाेते. त्याचे रिपाेर्ट प्राप्त झाले असून, त्या काेंबड्यांचा मृत्यू ‘बर्ड फ्लू’ने झाला नसल्याचे त्या रिपाेर्टमध्ये नमूद केले आहे. कळमेश्वर तालुक्यात काही शेतकरी शेतीला जाेडधंदा म्हणून कुक्कुटपालन करीत आहेत. ‘बर्ड फ्लू’ची धास्ती आणि काेंबड्यांच्या मृत्यूचे वाढते प्रमाण यामुळे ग्राहक काेंबडीचे मांस खरेदी करण्यास तयार नाहीत. त्यामुळे कुक्कुटपालन करणारे आर्थिक संकटात सापडले आहेत.
हा व्यवसाय सुरू करताना त्याची शासन दरबारी नाेंद करणे अनिवार्य असताना तालुक्यात अनेकांनी त्याकडे दुर्लक्ष केले आहे. शिवाय, पशुसंवर्धन विभागातील अधिकाऱ्यांनी सर्वेक्षण करून नाेंदणी नसलेल्या पाेल्ट्री फार्मची नाेंदणी करवून घेण्याची तसदी घेतली नाही. त्यामुळे तालुक्यात नेमके किती काेंबड्यांचे उत्पादन घेतले जाते. त्यांची वार्षिक उलाढाल किती, याबाबत प्रशासनाकडे अधिकृत आकडेवारीदेखील उपलब्ध नाही. काहींनी चंद्रभागा नदीच्या पात्रात मृत काेंबड्या टाकल्याने त्या आता सडल्या आहेत. या प्रकारामुळे नागरिकांसह गुरांचे आराेग्य धाेक्यात येऊ नये म्हणून मोहगाव ग्रामपंचायत प्रशासनाने पुढाकार घेत नदीपात्रातील संपूर्ण मृत कोंबड्या बाहेर काढत त्यांची याेग्य विल्हेवाट लावली. दुसरीकडे, प्रशासनाने मृत काेंबड्या फेकणाऱ्यांचा शाेध घेऊन त्यांच्यावर कठाेर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
...
मृत काेंबड्या नदीच्या पात्रात
पाेल्ट्री फार्म मालकांनी मृत काेंबड्यांची याेग्य विल्हेवाट न लावता त्या उघड्यावर फेकायला सुरुवात केली आहे. काही दिवसांपूर्वी कळमेश्वर - माेहपा मार्गावरील चंद्रभागा नदीच्या पात्रात १००च्या आसपास मृत काेंबड्या आढळून आल्या हाेत्या. त्यानंतर तालुक्यातील सावळी (खुर्द) शिवारातील शेतात २५० मृत काेंबड्या उघड्यावर टाकण्यात आल्या हाेत्या. मृत काेंबड्यांची याेग्य विल्हेवाट लावली जात नसल्याने स्थानिक नागरिकांमध्ये असंताेष निर्माण हाेत आहे. विशेष म्हणजे, या दाेन्ही प्रकाराची पशुसंवर्धन विभागातील अधिकाऱ्यांनी पाहणी केली आहे. मृत काेंबड्या सडल्याने नदीतील पाणी दूषित झाले असून, परिसरात दुर्गंधी सुटली आहे. त्यामुळे माणसांसाेबत गुरांचे आराेग्य धाेक्यात येण्याची शक्यता बळावली अहे.
...
४ लाख ३६ हजार पक्षी
कळमेश्वर तालुक्यातील नाेंदणी नसलेल्या ४० पाेल्ट्री फार्ममध्ये ब्रायलर व काॅकरेल जातीचे ४ लाख ३६ हजार ७२० आहेत, अशी माहिती सुत्रांनी दिली. याव्यतिरिक्त १८ पोल्ट्री फार्मची ३ लाख ९२ हजार कोंबड्या ठेवण्याची क्षमता आहे. परंतु या पोल्ट्रीवर किती कोंबड्या आहेत, याबाबत परिपूर्ण माहिती पशुसंवर्धन विभागाकडे सध्यातरी उपलब्ध नाही. कोंबड्यांचा ‘बर्ड फ्लू’ऐवजी अन्य आजारांनी मृत्यू झाल्यास मृत कोंबड्यांची विल्हेवाट लावण्यासाठी खोदलेल्या खड्ड्यात आधी चुना टाकून त्यावर पक्षी टाकले जातात. नंतर माती लोटून खड्डा बुजवला जातो. प्राण्यांनी तो उकरू नये, यासाठी त्यावर काटेरी झुडपे किंवा दगड टाकावे, अशी माहीती पशुधन विकास अधिकारी डाॅ. हेमंत माळोदे यांनी दिली.
....
तालुक्यातील पोल्ट्री व्यावसायिकांनी नोंदणी करण्यासाठी पशुसंवर्धन विभागासोबत संपर्क साधावा. मृत कोंबड्या उघड्यावर न फेकता खड्डा खाेदून त्यात योग्य रितीने त्यांची विल्हेवाट लावावी.
- डॉ. जयश्री भूगावकर,
सहायक आयुक्त,
लघुपशुवैद्यकीय सर्वचिकित्सालय, कळमेश्वर