नागपूर : बदलत्या जीवनशैलीचे दुष्परिणाम आरोग्यावर होत आहेत. ताणतणाव युक्त जीवनशैलीमुळे हल्ली कमी वयातच उच्चरक्तदाबाचे रुग्ण दिसून येत आहेत. तरुणांमध्ये या विकाराची ४० टक्क्यांनी वाढ झाल्याची नोंद आहे. उच्चरक्तदाबाच्या एकूण रुग्णांपैकी २० टक्के रुग्णांना मधूमेह असतो. त्यामुळे उच्चरक्तदाबाचे वेळेतच निदान व त्यावर उपचार केले पाहिजेत, असे मत हृदयरोगतज्ज्ञ डॉ. अमेय बीडकर यांनी व्यक्त केले.
१७ मे हा दिवस जगभरात उच्चरक्तदाब दिवस म्हणून साजरा केला जातो. त्या निमित्ताने ते ‘लोकमत’शी बोलत होते. डॉ. बीडकर म्हणाले, उच्च रक्तदाबाची लक्षणे लवकर दिसत नाही. अशास्थितीत एखाद्या रुग्णाच्या अवयवांपर्यंत जास्त दाबाने रक्त प्रवाहित होत असल्यास अवयवांना हानी पोहचण्याची शक्यता असते.
-अनियंत्रित रक्तदाबामुळे वाढते गुंतागुतअनियंत्रित रक्तदाबामुळे अनेक गंभीर गुंतागुंत होऊ शकतात. मेंदूला आघात होऊन पक्षाघात आणि रक्तस्त्राव अशा समस्या निर्माण होऊ शकतात. डोळ्यांना हानी होऊन दृष्टी देखील जाऊ शकते. मुत्रपिंड निकामी होऊ शकतात. हृदय, रक्तवाहिन्या अशा रक्ताभिसरण प्रक्रियेतील अवयवांचे कार्यान्वयन गडबडून हृदयविकार देखील संभवतात. शिवाय उच्चरक्तदाब विकारासोबत मधूमेह, वाढलेले कोलेस्ट्रॉल, वाढलेले युरिक अॅसिड अशा समस्यांना देखील निमंत्रण मिळते. त्याशिवाय उच्चरक्तदाब विकाराने ग्रस्त ३० टक्के रुग्णांना वाढलेल्या बॅड कोलेस्ट्रॉलचा विकार, २५ टक्के रुग्णांना युरिक अॅसिड वाढलेले असल्याचा आणि ३५ ते ४० टक्के रुग्णांना लठ्ठपणाचा त्रास होतो. त्यामुळे उच्चरक्तदाब नियंत्रणात ठेवला तर अन्य विकारांपासून दूर राहता येते.
-हायपरटेन्शन म्हणजे काय?उच्चरक्तदाब म्हणजे हायपरटेन्शन. प्रौढ व्यक्तीमध्ये सामान्य रक्तदाब १२०/८० असतो. या संख्येत किंचीत चढ-उतार होऊ शकतात. परंतु जर रक्तदाब हा वारंवार १४०/९० पेक्षा जास्त असेल तर याचा अर्थ उच्चरक्तदाबाची शक्यता असते.
-उच्चरक्तदाब टाळण्यासाठी हे करारक्तदाब विकार हा जीवनशैलीशी निगडीत आहे. त्यामुळे ताणतणावमुक्त व संतुलित जीवनशैली स्वीकारने हा उपचाराचा पहिला टप्पा आहे. आहारातून फॅटयुक्त, तेलयुक्त, फास्ट व जंकफुड, अधिक मीठ असलेले पदार्थ टाळावे. वरून मीठ घेणे देखील टाळावे. नियमित व्यायाम करावा. मात्र, एवढे पुरेसे नसते; औषधोपचरांनी रक्तदाब नियंत्रणात आणावा लागतो. जीवनशैलीतील बदल देखील अत्यंत आवश्यक आहे. आहारावर नियंत्रण तेवढेच महत्त्वाचे आहे. औषधोपचार आणि जीवनशैलीतील बदल हीच उपचारांची द्विसूत्री आहे.
-रक्तदाब मोजण्याचा संकल्प कराकोविड असो वा अन्य कुठलेही विकार, उच्चरक्तदाबग्रस्त व्यक्तींना सर्वाधिक जोखिम असते. मात्र, रक्तदाब नियंत्रणात ठेवला तर गुंतागूंत टाळता येतो. त्यासाठी वषार्तून किमान एकदा स्वत:चा रक्तदाब मोजून घेण्याचा संकल्प केला पाहिजे. कारण रक्तदाब नियंत्रणा तर जीवन सुदृढ.-डॉ. अमेय बीडकर, हृदयरोगतज्ज्ञ