अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष : पार्किंगचे शुल्क वाढविले लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर ‘पिकअप अॅण्ड ड्रॉप’ सुविधा वाहनचालकांसाठी नेहमीच डोकदुखी ठरली आहे. या परिसरातून प्रत्येक वाहनाकडून ४० रुपये तर १० सेकंद उशीर झाल्यास जामर लावून ३०० रुपयांचे बिल वाहनचालकांकडून वसूल करण्यात येत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. विमानतळ संचालकांनी कंत्राटदारावर कारवाई करण्याची प्रवाशांची मागणी आहे. अधिकाऱ्यांनी कारवाई करावी ‘पिक अॅण्ड ड्रॉप’ परिसरात पार्किंगचे शुल्क आकारण्यात येत असल्याची तक्रार शनिवारी रात्री मुंबईहून आलेल्या प्रवाशांनी केली. त्यांच्या कुटुंबाकडून या परिसरात कारच्या प्रवेशासाठी ४० रुपये शुल्क आकारले. वाहनाने विमानतळ परिसरात प्रवेश करताच ‘पिक अॅण्ड ड्रॉप’ परिसरात कार थांबविली असता जामर लावण्यात आला. कर्मचाऱ्यांना विचारणा केली असता या परिसरातून प्रवाशांना नेता येत नाही, असे उत्तर मिळाले. मग विमानतळावर प्रवाशांना नेण्याची सुविधा आहे का, असा सवाल या निमित्ताने उपस्थित झाला आहे. कंत्राटदाराने पार्किंगचे शुल्क वाढविले आहे. शिवाय कंत्राटदाराचे कर्मचारी वाहनचालकांसोबत दुर्व्यवहार करीत असून अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केले आहे. कंत्राटदारावर कारवाई करण्याची मागणी वाहनचालक आणि प्रवाशांनी केली आहे. दुचाकी व चारचाकी वाहन उभे करण्याची सुविधा विमानतळाच्या पार्किंग परिसरात ६०० दुचाकी आणि चारचाकी वाहने उभी करण्याची नि:शुल्क सुविधा आहे. त्यानंतरही कंत्राटदार वाहनचालकांकडून ४० रुपये वसूल करीत आहेत. दरदिवशीची विमान सेवा पाहिल्यास कंत्राटदार हजारो रुपये अवैधरीत्या वसूल करीत आहे.
विमानतळ पार्किंगमध्ये प्रवेशासाठी ४० रुपये
By admin | Published: May 08, 2017 2:33 AM