नागपूर : 'ईव्हीएम'च्या वापराबाबत अनेक तक्रारी आहेत. त्यात छेडछाड करता येते, निकाल फिरविता येत असल्याने 'ईव्हीएम'द्वारे मतदान घेण्यावर नागरिकांचा विश्वास राहिलेला नाही. केंद्रीय निवडणूक आयोगाकडे बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याची वारंवार मागणी केली, यासाठी देशभरात आंदोलन केले. परंतु निवडणूक आयोगाने त्याची दखल घेतलेली नाही. देशातील लोकशाही जीवंत ठेवण्यासाठी नागपूर व रामटेक लोकसभा मतदार संघात प्रत्येकी ४०० उमेदवार उभे करण्याचा निर्धार इंडिया अगेंस्ट ईव्हीएम चे पदाधिकारी अॅड. आकाश मून, अॅड. स्मिता कांबळे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.
देशातील निवडणूक प्रक्रीया ही निष्पक्ष व पारदर्शी असणे आवश्यक आहे. परंतु निवडणूक आयोगाचीच भूमिका संशयास्पद आहे. सर्वोच्च न्यायालय सुध्दा यावर ठोस भूमिका घेताना दिसत नसल्याने देशापुढे मोठे संकट आहे. यामुळे रामटेक व नागपूर लोकसभा मतदार संघात प्रत्येकी ४०० उमेदवार उभे केल्यास ईव्हीएम मशीन काम करणार नाही. पर्यायाने बॅलेट पेपरवर निवडणुका घ्याव्या लागतील. महाराष्ट्रात रामटेक व नागपूर लोकसभेची निवडणूक पहिल्या टप्प्यात असल्याने त्यानंतरच्या टप्प्यात राज्याच्या अन्य भागातही नागपूर व रामटेक प्रमाणे प्रत्येकी ४०० उमेदवार उभे राहतील असा विश्वास इंडिया अगेंस्ट ईव्हीएमच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. यावेळी इंडिया अगेंस्ट ईव्हीएमचे मार्गदर्शक अमन कांबळे , राष्ट्रीय प्रवक्ते विश्वास पाटील, राज सुखदेवे,भारत लोखंडे, अरुण भारशंक,राजेश लांजेवार यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
२०१८ पासून ईव्हीएम विरोधात लढा
ईव्हीएम विरोधात २०१८ पासून देशभरात लढा सुरू आहे. निवडणूक आयोगाकडे ८ हजार तक्रारी आहेत. सर्वोच्च न्यायालयानेही ईव्हीएम हॅक होवू शकते असे मान्य केले आहे. अशा परिस्थितीत देशातील निवडणुका निष्पक्ष व पारदर्शी होणार नाही. ईव्हीएम नसेल तर भाजपची सत्ता येणार नाही. मतदारांच्या मतांची चोरी होत असल्याने बॅलेटनुसार निवडणुका घ्याव्यात अशी मागणी अॅड. आकाश मून यांनी केली.
जपान,अमेरिकेत ईव्हीएमवर बंदी का?
ईव्हीएमध्ये छेडछाड करता येत नसल्याचा दावा निवडणूक आयोगाकडून केला जातो. परंतु भारतापेक्षा तंत्रज्ञानात प्रगत असलेल्या जपान, अमेरिका यासारख्या देशात ईव्हीएमवर बंदी आहे. या देशांनी ईव्हीएमवर बंदी का घातली याचाही निवडणूक आयोगाने खुलासा करावा, सोबतच याचा अभ्यास करावा असा सल्ला इंडिया अगेंस्ट ईव्हीएमच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी दिला.
तर निवडणूक विभागाची चिंता वाढणार
लोकसभा निवडणुकीत ४०० पेक्षा जास्त उमेदवार उभे राहिल्यास ईव्हीएम काम करणार नाही. परिणामी बॅलेटवर निवडणुका घ्याव्या लागतील. नागपूर व रामटेक मतदार संघात असे झाले जिल्हा निवडणूक विभागाची चिंता वाढणार आहे. त्यांना अडचणींना सामोरे जावे लागेल अशी शक्यता वर्तवली जात आहे.