नागपूर : साडेतीन मुहूर्तापैकी एक दसरा सणात सर्वाधिक उत्साह ऑटोमोबाईल सराफा, इलेक्ट्रॉनिक्स, प्रॉपर्टी क्षेत्रात दिसून आला. अनेकांनी बुकिंग केलेल्या दुचाकी आणि चारचाकी घरी नेल्या. सोने खरेदीसाठी सराफांकडे अपेक्षेपेक्षा जास्त गर्दी होती. अनेकांनी फ्लॅटचे बुकिंग याच शुभमुहूर्तावर केले. लोकांनी हायएन्ड इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची मोठ्या प्रमाणात खरेदी केली. सर्व बाजारपेठांचा आढावा घेतला असता जवळपास ४०० कोटींची उलाढाल झाल्याचा अंदाज आहे. लोकांनी दसऱ्यालाच ४०० कोटींची दिवाळी साजरी केल्याची व्यापारी वर्तुळात चर्चा आहे.
कार, दुचाकीची सर्वाधिक विक्री
विविध कंपन्यांची वर्षभरातील एकूण विक्रीपैकी २५ टक्के वाहनांची विक्री नवरात्रीपासून दिवाळीपर्यंत होते. त्यात मारुती व ह्युंडई या चारचाकी कंपनीचा सर्वाधिक तर दुचाकींमध्ये होंडा, हीरो व टीव्हीएस कंपनीचा जास्त वाटा असतो. चारचाकीमध्ये मारुती, ह्युंडई, होंडा, टोयोटा, टाटा, रेनॉल्ट, स्कोडा, बीएमडब्ल्यू, ऑडी, मर्सिडीज आदींसह नागपुरात नामांकित कंपन्यांच्या एकूण १६ शोरूम आहेत. नागपुरात दसऱ्याला सर्वच कंपन्यांच्या एकूण ७०० कारची विक्री झाली आहे. यामध्ये ५ ते ७ टक्के ईव्ही कारचा समावेश आहे.
दसऱ्याला ७०० कार रस्त्यावर
अरूण मोटर्स मारुती सुझुकीचे संचालक करण पाटणी म्हणाले, दसऱ्या मारुती सुझुकीच्या चार डीलर्सच्या आसपास ४०० कार दसऱ्याला रस्त्यावर धावल्या. यंदा चांगला प्रतिसाद मिळाला.इरोज ह्युंडईचे महाव्यवस्थापक सूरज भुसारी म्हणाले, कंपनीच्या तिन्ही डीलर्सच्या शोरूमधून १५० हून अधिक कारची विक्री झाली.
दसऱ्याला २५०० दुचाकींची डिलेव्हरी
आधीच बुकिंग केलेल्या २५०० हून अधिक दुचाकी ग्राहकांनी दसऱ्याला घरी नेल्या. होंडा, बजाज, हीरो, टीव्हीएस, सुझुकी, बुलेट, महिन्द्र, यामाहा या कंपन्यांच्या स्कूटरेट आणि दुचाकीची विक्री झाली. याशिवाय १०० हून अधिक ईव्ही वाहने विकली गेली.
वाढत्या दरासोबतच विक्री वाढली
सोन्याच्या वाढत्या किमतीसोबतच लोकांची खरेदी वाढली आहे. नागपुरात सराफांची २ हजार दुकाने आणि शोरूम आहेत. त्यात ३० हून अधिक मोठी आहे. यंदा सोने ६१ हजारांवर गेल्यानंतरही लोकांनी मोठ्या प्रमाणात खरेदी केली. १ ते १० ग्रॅम वजनाच्या नाण्यांची विक्री झाली. चांदीचे ताट, वाटी, ग्लास आणि भेटवस्तूंना मागणी होती. यंदा दसऱ्यापर्यंत १२५ कोटींहून अधिक उलाढाल झाली.राजेश रोकडे, सचिव, नागपूर सराफा असोसिएशन.
इलेक्ट्रॉनिक्स विक्री १०० कोटींची!
दसऱ्याला मोबाईल, एलईडी, फ्रिज, वॉशिंग मशीन, ओव्हन, लॅपटॉपला जास्त मागणी होती. बँका आणि खासगी आर्थिक संस्थांच्या शून्य टक्के योजनांमध्ये ग्राहकांची खरेदी सुलभ झाली. उपकरणांच्या विक्रीचा आकड़ा निश्चित सांगणे कठीण असले तरीही दसऱ्याला १०० हून अधिक कोटींची उलाढाल झाली. श्रीकांत इलेक्ट्रॉनिक्सचे संचालक श्रीकांत भांडारकर म्हणाले, नागपुरात २०० हून अधिक शोरूम आहेत. सर्वांनीच चांगला व्यवसाय केला. जास्त किमतीच्या वस्तूंना जास्त मागणी होती. लोटस मार्केटिंगचे संचालक गौरव पाहावा म्हणाले, नागपूरचे मार्केट मोठे आहे. लोटसच्या दोन शोरूममध्ये आहेत. कमी वेळात जास्त मार्केट काबीज केले आहे. दसऱ्याला चांगला व्यवसाय केला. दिवाळीसाठी सज्ज आहे.
७०० हून अधिक फ्लॅटचे बुकिंग
नागपुरात एक हजारांहून अधिक प्रकल्पांचे बांधकाम सुरू असून या प्रकल्पांमध्ये ५ हजारांहून अधिक फ्लॅट, डुप्लेक्स, बंगले विक्रीला आहेत. दसऱ्याला ७०० हून अधिक फ्लॅटचे बुकिंंग झाल्याचे क्रेडाई महाराष्ट्र मेट्रोचे माजी अध्यक्ष प्रशांत सरोदे म्हणाले.
क्रेडाई नागपूर मेट्रोने राबविलेल्या प्रॉपर्टी एक्स्पोमुळे लोकांमध्ये जागरूकता निर्माण झाली आणि त्याचा फायदा फ्लॅट बुकिंगला मिळाला. दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर सर्वच प्रकल्पांमध्ये फ्लॅटचे बुकिंग झाले. गेल्यावर्षीच्या तुलनेत २० ते २५ टक्के जास्त ग्रोथ बघायला मिळाली. बिल्डरांचा १०० कोटीहून अधिक व्यवसाय झाला.गौरव अगरवाला, अध्यक्ष, क्रेडाई नागपूर मेट्रो.