लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : देशात चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याचे अभियान देशात जोरात सुरू आहे. यावर्षी भारतीय राख्यांची जास्त विक्री होताना दिसत आहे. त्यामुळे या सणाच्या माध्यमातून ४ हजार कोटींचा झटका बसत असल्याचे संकेत व्यापाऱ्यांच्या देशव्यापी खरेदीतून दिसून येत आहे. देशातील ८ कोटी रिटेल व्यापाऱ्यांची संघटना कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने (कॅट) चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याच्या अभियानांतर्गत केवळ भारतीय वस्तूंचा स्वीकार आणि व्यापार करण्याचे आवाहन केले होते. हे अभियान १० जूनपासून सुरू केले आहे. हे अभियान यशस्वी होताना दिसत असल्याचे मत कॅटचे अध्यक्ष बी.सी. भरतीया यांनी व्यक्त केले.
ते म्हणाले, यावर्षी राखी आणि राखी तयार करण्यासाठी लागणाºया वस्तू चीनमधून मागविण्यात आलेल्या नाहीत. संपूर्ण देशात कॅटच्या सहकार्याने भारतीय वस्तूंनी जवळपास १ कोटी राख्या मध्यमवर्ग आणि घरांमध्ये काम करणाऱ्या महिला तसेच अंगणवाडीत काम करणाऱ्या महिलांसह अन्य लोकांनी अनेक प्रकार आणि नवनवीन डिझाईनमध्ये तयार केल्या आहेत. या राख्यांना भारतीय व्यापारी आणि महिलांनी उत्तम प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे बाजारात भारतीय बनावटीच्या राख्यांची विक्री होताना दिसत आहे.
भरतीया म्हणाले, एका अहवालानुसार देशात दरवर्षी ५० कोटी राख्यांचा व्यवसाय होतो. त्यांची किंमत जवळपास ६ हजार कोटी आहे. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून चीनहून राख्या आणि राख्यांच्या बनावटीच्या जवळपास ४ हजार कोटींचा वस्तू भारतात यायच्या. पण यावर्षी कुणीही आयात केली नाही. कोरोनाच्या भितीमुळे लोक बाजारात गेले नाहीत आणि अनेकांनी ऑनलाईन राख्यांची खरेदी केली. कॅटने भारतीय परंपरेनुसार वैदिक राख्या तयार करण्याचे आवाहन लोकांना केले होते. त्यालाही चांगला प्रतिसाद मिळाला. आता यापुढील सणांमध्येही कॅटच्या आवाहनाला प्रतिसाद मिळणार आहे.