लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण पुन्हा सातत्याने आढळून येत आहेत. बुधवारी ४०३ नवीन पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले, तर ९ जणांचा मृत्यू झाला. बुधवारी आढळून आलेल्या एकूण पॉझिटिव्ह रुग्णांपैकी ३३७ रुग्ण हे शहरातील व ग्रामीणमधील ६२ रुग्ण आहेत तर जिल्ह्याबाहेरचे ४ रुग्ण आहेत. मृतामध्ये ग्रामीणचे ३, शहरातील २ व जिल्ह्याबाहेरचे ४ जण आहेत.
बुधवारी एकूण ४,९४३ नमुने तपासण्यात आले. त्यापैकी ४०३ पॉझिटिव्ह सापडले, तर २३० रुग्ण बरे होऊन घरी परतले. एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १,१५,७२८ इतकी झाली असून, यापैकी १,०६,०९२ रुग्ण बरे हाेऊन आपल्या घरी परत गेले आहेत तर मृत्यूची संख्या ३,७६३ वर पोहोचली. सध्या ५,८७३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यात शहरातील ५,०५७ व ग्रामीणच्या ८१६ जणांचा समावेश आहे.