देशात हायकोर्ट न्यायमूर्तींची ४०४ पदे रिक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2020 11:09 AM2020-10-03T11:09:27+5:302020-10-03T11:11:10+5:30
High court Nagpur News देशामध्ये हायकोर्ट न्यायमूर्तींची ४०४ पदे रिक्त आहेत. त्यात २४६ कायम तर, १५८ अतिरिक्त पदांचा समावेश आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : देशामध्ये हायकोर्ट न्यायमूर्तींची ४०४ पदे रिक्त आहेत. त्यात २४६ कायम तर, १५८ अतिरिक्त पदांचा समावेश आहे. केंद्रीय न्याय विभागाद्वारे १ ऑक्टोबर रोजी ही आकडेवारी जाहीर करण्यात आली.
देशात २५ हायकोर्ट कार्यरत असून त्यांना न्यायमूर्तींची एकूण १०७९ (कायम-८१५, अतिरिक्त-२६४) पदे मंजूर आहेत. सध्या सर्व हायकोर्टांमध्ये एकूण६७५ (कायम-५६९, अतिरिक्त-१०६) न्यायमूर्ती कार्यरत आहेत.
रिक्त पदांमध्ये अलाहाबाद हायकोर्ट पहिल्या क्रमांकावर आहे. या हायकोर्टात न्यायमूर्तींच्या १६० पदांपैकी सर्वाधिक ६० पदे रिक्त आहेत. कोलकाता हायकोर्टात ७२ पैकी ३७, पंजाब व हरयाणा हायकोर्टात ८५ पैकी ३१ तर, पाटणा हायकोर्टात ५३ पैकी ३० पदे रिक्त आहेत. मणिपूर (५), मेघालय (४), त्रिपुरा (४) व सिक्कीम (३) या चार हायकोर्टातील सर्व पदे भरली आहेत.
मुंबई हायकोर्टात २८ पदे रिक्त
मुंबई हायकोर्टात २० कायम व ८ अतिरिक्त अशी एकूण २८ पदे रिक्त आहेत. या हायकोर्टाला ७१ कायम व २३ अतिरिक्त अशी एकूण ९४ पदे मंजूर असून सध्या ५१ कायम व १५ अतिरिक्त असे एकूण ६६ न्यायमूर्ती कार्यरत आहेत.
सर्वोच्च न्यायालयात ४ पदे रिक्त
सर्वोच्च न्यायालयाला न्यायमूर्तींची ३४ पदे मंजूर असून सध्या ३० न्यायमूर्ती कार्यरत आहेत. ४ पदे रिक्त आहेत.