लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर - दुसऱ्याच्या घराची बनावट कागदपत्रे तयार करून एका व्यावसायिकाला चाैघांनी ४१ लाखांचा गंडा घातला. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर सुमित ऊर्फ अंकित सुरेंद्र ग्रोवर (वय ३१) यांनी पोलिसांकडे धाव घेतली. त्यावरून पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.
आरोपी उमेश केवलकृष्ण सहानी (वय ५४, रा. पुणे), निधी उमेश सहानी (वय ५०),अनिल भसिन (वय ६०) आणि निकिल राजेश कपूर (वय ३८) अशी आरोपींची नावे आहेत.
या चाैघांनी बनावट कागदपत्रे तयार करून पाचपावलीतील अशोक चौकात असलेल्या एका घराला उमेश सहानी यांचे घर असल्याची माहिती अंकित ग्रोवर यांना दिली. त्या कागदपत्रांच्या आधारे ग्रोवर यांच्यासोबत सदर घर १ कोटी, ५१ लाख रुपयांत विकण्याचा साैदा केला. त्यानंतर आरोपींनी ग्रोवर यांच्याकडून गेल्या वर्षभरात ४१ लाख रुपये विविध माध्यमातून घेतले. एवढी मोठी रक्कम दिल्यानंतर ग्रोवर यांनी विक्रीची तयारी करतानाच घराची कागदपत्रे तपासली असता ती बनावट असल्याचे आणि संबंधित मालमत्तेशी आरोपींचा कसलाही संबंध नसल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली. ग्रोवर यांच्या तक्रारीवरून पाचपावली पोलिसांनी उपरोक्त आरोपींविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. आरोपींचा शोध घेतला जात आहे.