ठाणे : नागपूर येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संजय सोलंकी (५४) आणि त्यांच्या पत्नी विजया सोलंकी यांच्याविरुद्ध ४१ लाख ३१ हजार १३५ रुपयांची अपसंपदा बाळगल्याप्रकरणी वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी गुन्हा दाखल केला आहे. मंत्रालयातील बांधकाम विभागामध्ये अवर सचिव असताना त्यांनी ही कथित अपसंपदा जमवल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.
सोलंकी यांच्याविरुद्ध ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून सुरू असलेल्या मालमत्तेच्या चौकशीमध्ये त्यांनी अपसंपदा संपादित केल्याचे उघड झाले होते. त्यामुळे ते सेवेत असताना त्यांनी संपादित केलेल्या अपसंपदेवरून तसेच त्यांच्या पत्नीने साहाय्य केल्यामुळे त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
सोलंकी यांनी ३ डिसेंबर १९८५ ते ११ जून २०१५ या कालावधी’ सेवेत असताना त्यांनी कायदेशीर मार्गाने मिळणाऱ्या उत्पन्नापेक्षा ४१ लाख ३१ हजारांची अपसंपदा संपादित केली. त्यामुळे सोलंकी दाम्पत्याविरुद्ध १२ एप्रिल २०१९ रोजी भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमनानुसार हा गुन्हा दाखल झाला आहे.