नरेश डोंगरे /
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अवघ्या सात दिवसात शहरातील ४१७ गुंडांच्या मुसक्या बांधून पोलिसांनी त्यांना कोठडीत डांबले. शहरातील पाचपैकी सर्वाधिक १२३ गुंड परिमंडळ पाचच्या पोलिसांनी जेरबंद केले.
ऑपरेशन क्रॅक डाऊनअंतर्गत २५ मे ते १ जूनपर्यंत फरार आणि पोलिसांच्या रेकॉर्डवर वाँटेड असलेल्या गुन्हेगारांना पकडण्याची विशेष मोहीम शहर पोलिसांनी उपराजधानीत राबविली. या मोहिमेत गुन्हे शाखेसोबतच शहरातील सर्वच पोलीस उपायुक्तांनी आपापल्या परिक्षेत्रातील गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यासाठी विशेष प्रयत्न केले. त्यानुसार २५ मे ते १ जूनदरम्यान शहरात ११७ फरार गुन्हेगारांना जेरबंद करण्यात आले, तर पोलिसांच्या रेकॉर्डवर वाँटेड (पाहिजे) असलेल्या ३०० गुन्हेगारांना पोलिसांनी हुडकून काढले. अशाप्रकारे अवघ्या सात दिवसात ४१७ गुन्हेगारांना पकडून पोलिसांनी त्यांना कोठडीत डांबले. या गुन्हेगारांमध्ये हत्या, हत्येचा प्रयत्न, अपहरण, दंगा, खंडणी वसुली, बलात्कार, हाणामारी, विनयभंग, ड्रग्ज तस्करी अशा गंभीर गुन्ह्यांत सहभागी असलेल्या आरोपींचा समावेश आहे. त्यांच्यापैकी काहींच्या जवळ पोलिसांना शस्त्रही सापडले.
---
परिमंडळ पाच नंबर - १
४१७ पैकी परिमंडल एकमध्ये फरार २, तर, वाँटेड ९ असे ११ गुन्हेगार पकडले गेले. परिमंडळ दोनमध्ये फरार १९, तर वाँटेड ९०, परिमंडळ तीन - फरार ८, वाँटेड ५४, परिमंडळ चार - फरार २, वाँटेड ५४ गुन्हेगारांना अटक करण्यात आली. सर्वाधिक चांगली कामगिरी परिमंडळ ५ मध्ये बजावली गेली. या झोनमध्ये फरार ६०, तर वाँटेड ६३ गुन्हेगारांच्या मुसक्या बांधण्यात आल्या.
---
गुन्हे शाखेचे ''अब तक ५६''
या मोहिमेत गुन्हे शाखेच्या पोलिसांनी फरार २६ आणि वाँटेड ३० असे एकूण ५६ गुन्हेगार जेरबंद केले.
---