लाेकमत न्यूज नेटवर्क
कळमेश्वर : स्थानिक गुन्हे शाखा आणि कळमेश्वर पाेलिसांच्या संयुक्त पथकाने कळमेश्वर पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील गाेंडखैरी बरड येथील माेहफुलाच्या दारूभट्ट्यावर धाडी टाकल्या. यात २२ जणांविरुद्ध गुन्हे नाेंदविण्यात आले असून, त्यांच्याकडून एकूण ४२ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई शुक्रवारी (दि. ३०) दुपारी करण्यात आली.
गाेंडखैरी (ता. कळमेश्वर) येथील बरड हा भाग माेहफुलाची दारू निर्मिती आणि अवैध दारूविक्रीसाठी परिसरात प्रसिद्ध आहे. लाॅकडाऊनमुळे दारूची दुकाने बंद असल्याने येथील अवैध दारू निर्मिती व विक्रीला उधाण आले हाेते. त्यातच स्थानिक गुन्हे शाखा व कळमेश्वर पाेलिसांनी या ठिकाणी धाड टाकली. यात संपूर्ण दारूभट्ट्या उद्ध्वस्त करण्यात आल्या असून, पाेलिसांनी २२ जणांविरुद्ध गुन्हे नाेंदविले आहेत. शिवाय, त्यांच्याकडून एकूण ४२ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.
यात १,८४० लिटर दारू तयार करण्यासाठी वापरले जाणारे रसायन (माेहफूल सडवा), ४७४ लिटर माेहफुलाची दारू, ९८ ड्रम, घमेले व इतर साहित्याचा समावेश आहे. याप्रकरणी कळमेश्वर पाेलिसांनी गुन्हा नाेंदवून तपास सुरू केला आहे. ही कारवाई सहायक पाेलीस निरीक्षक सर्वश्री मुंडे, खडे, मेश्राम, सावळा, पाेलीस उपनिरीक्षक सर्वश्री बुंदे, मुंडे, गायकवाड, सहायक फाैजदार सर्वश्री धुर्वे, पाली, हवालदार मन्नान नाैरंगाबादे, उईके, मुदमाळी, बाेरकर, नीलेश उईके यांच्या पथकाने केली.